पर्रिकर यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी साथ द्या:मोदी

0
766
गोवा खबर:लोकसभा निवडणूकांच्या प्रचारसभेसाठी गोव्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना ऊजाळा दिला.पर्रीकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सदैव गोव्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्रीकरांनी गोव्यात जो रस्ता तयार केला त्यावरून गोव्याला पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्यावेळी मदत हवी असेल त्यावेळी आपण तुमच्या सोबत असेन असे सांगत खाण प्रश्न गोमंतकीयांना अपेक्षित असलेल्या पद्धतीने सोडवला जाईल,असे आश्वासन देखील मोदी यांनी यावेळी दिले.
बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये आयोजित प्रचार सभेला सुमारे 35 हजार लोक उपस्थित होते.यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले,अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कारकिर्दीत शहिदांसाठी मानवीय दृष्टीकोनातून निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शहिद जवानांचे पार्थिव आज घरापर्यंत येत आहे. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस हे संरक्षणमंत्री होते. या शवपेटयांचे काँग्रेसने भांडवल केले. अशा गोष्टीत काँग्रेस माहीर आहे, असा आरोप मोदी यांनी केला.
देश लुटण्यासाठी काँग्रेस पुन्हा एकदा संधी शोधत आहे. आता महागठबंधन  करून देश लुटायची तयारी केली आहे. अशा काँग्रेसपासून सावध रहा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभेत बोलताना केले.
आपण चौकीदाराची भूमिका निभावत आलो असून काँग्रेसला देश लुटू देणार नाही. आपण सर्वांनीच चौकीदार बनून देश राखायला हवा, वाढवायला हवा, असे त्यांनी सांगितले.
वातावरणात प्रचंड उकाडा असूनही या सभेला मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती. महिला व युवकांचा उत्साह दिसून येत होता. मोदींच्या जयकाराने सारा परिसर दणाणून गेला होता.
काँग्रेस सत्ताकाळात देशाची प्रचंड लूट झाली. काँग्रेस पक्षाने संरक्षण मंत्रायलयाचेही हाल केले. संरक्षण मंत्रालयाच्या डीलमध्ये असे काही केले की जवानांच्या पराक्रमालाही लाचार बनविले. बोफोर्समध्ये दलाली खाल्ली आणि क्वात्रोचीला पळून जाण्यास मदत केली. दशकभराच्या कालावधीत सेनेला तोफा मिळू शकल्या नाहीत. कारण काँग्रेसच्या पापामध्ये कुणी भागीदार बनायला तयार नव्हते. राफेल डीलमध्येही काँग्रेसचे दलाल आले व राफेल डील लटकले. 2014 मध्ये राफेल डीलची फाईलच काँग्रेसने बंद करून टाकली. हेलिकॉप्टर घोटाळ्यातही काँग्रेसने मोठी दलाली खाल्ली व संबंधितांना पळून जाण्यास मदत केली, असा आरोप मोदी यांनी केला.
काँग्रेसचा हात पुन्हा देशाची तिजोरी साफ करणार
काँग्रेसने क्वात्रोचीला पळायला मदत केली तशी हेलिकॉप्टर दलालांना पळायलाही मदत केली, मात्र चौकीदार येणार हे त्यांना माहित नव्हते. या दलालांना पाताळातूनही हुडकून काढणार आहे. एपी आणि फॅमिलीला किती लाच मिळाली हे आता समोर येणार आहे. काँग्रेसवाले हात सफाईत मास्टर आहेत. काँग्रेसच्या हातापासून सावध रहा. हा हात पुन्हा देशाची तिजोरी साफ करण्याचेच काम करेल, असा इशाराही मोदींनी दिला.
भाजपने सत्तेचा उपयोग देश मजबूत बनविण्यासाठी केला, तर काँग्रेसने सत्तेचा उपयोग देश लुटण्यासाठी केला. 15 वर्षानंतर मध्य प्रदेशात काँग्रेसला सत्ता मिळाली. आज तिथेही लुटालूट सुरू आहे. या लुटीच्या नोटांची धरपकड केली आहे. गोव्याच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा भाजपलाच सत्ता द्या, आपण देशाच्या सुरक्षेसाठी चौकीदाराची भूमिका निभावणार, असेही मोदी म्हणाले.
काँग्रेस नेते राहूल गांधी पर्रीकरांच्या भेटीसाठी आले आणि बाहेर जाऊन खोटे बोलले. आजारी व्यक्तीशीही अशा पद्धतीने वागण्याची काँग्रेसची निती असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. असे खोटे बोलणारे 125 कोटी जनतेच्या मनात कसा काय विश्वास निर्माण करणार असा सवालही मोदींनी उपस्थित केला.
पर्रीकरांनी गोव्यासाठी, देशासाठी समर्पण केले माजी मुख्यमंत्री व महान नेते मनोहर पर्रीकर यांनी गोव्यासाठी व देशासाठी समर्पित भावनेने काम केले. आज पर्रीकर आपल्यात नाहीत. गोव्यात अनेकवेळा आपण येतो, पण गोव्यातली ही पहिलीच घटना ज्यावेळी पर्रीकर आपल्यात नाहीत. ते आमच्यात नाहीत पण त्यांचे काम, त्यांचे संस्कार आमच्यात आहेत. प्रामाणिकपणे जनहितासाठी कसे काम करावे हे पर्रीकरांनी दाखवून दिले. सर्वसामान्य घटकांसाठी त्यांनी खूप काम केले. सबका साथ सबका विकास हे त्यांनी दाखवून दिले. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करायचे आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
संरक्षणमंत्री असताना पर्रीकरांनी सैनिकांसाठी खूप काम केले. राष्ट्रासाठी त्यांनी जे समर्पित भावनेने काम केले त्याची तुलना होऊ शकत नाही. सर्जिकल स्ट्राईकने भारताची नवीन निती दाखवून दिली. भारत देश दहशतवाद्यांना घरात घुसून मारू शकतो हे जगाला दाखवून दिले. पर्रीकर यांच्या सोबतीने संरक्षण मंत्रालयाला सरकारने एक वेगळी दिशा दाखविली, असा गौरवपूर्ण उल्लेख मोदींनी केला
गोव्यातील खाणबंदीबाबत लोकांना असलेली चिंता आपण जाणतो. ही समस्या कशी सोडवावी यावर विचार सुरू आहे. गोव्यातील लोकांशी आपण दिल्लीत बोललो. एका बाजूने सर्वोच्च न्यायालय आहे. त्यामुळे यावर कसा तोडगा काढावा याचा विचार करणार असल्याचे मोदी म्हणाले. कायदेशीर विचार करून व गोव्याचा सल्ला घेऊन काम केले जाणार आहे. खाणबंदीची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मच्छीमारांसाठी आवश्यक ती पावले उचलणार आहोत. त्यांच्यासाठी वेगळय़ा सुविधा, किसान कार्डनुसार शेतकऱ्यांना सुविधा मिळतात तशा सुविधा मच्छीमारांना मिळणार, असेही ते म्हणाले.
काँग्रेस सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणार. गोव्यातील जनता काँग्रेसला ओळखून आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असताना काँग्रेस नेते सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे गेले होते. काँग्रेसने गोव्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी काय केले नाही. सत्तेसाठी काँग्रेस कोणत्याही स्तराला जाऊ शकते याचे हे उदाहरण आहे. काँगेसच्या सत्ताकाळात गोव्याने मजबूत सरकारे पाहिली. दहा वर्षात काँगेसने 13 मुख्यमंत्री दिले. भ्रष्टाचार, फॅमिलीराज याच्यात गोवा अडकून राहिला, असे ते म्हणाले.
केंद्रातील भाजप सत्ताकाळात छोटय़ा राज्यांचा भरपूर विकास झाला. गोवा त्यामध्ये सर्वांत पुढे आहे. गोव्याने विकासाचे मॉडेल तयार केले. पर्रीकरांनी विकासाला आकार दिला. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हा विकास पुढे नेणार असा आपल्याला विश्वास आहे. गोव्याच्या विकासासाठी व रोजगारासाठी भाजपने निष्ठेने काम केले. पर्यटन वाढीसाठी पाच वर्षात खूप काम केले. ई व्हीसा, ऑनलाईन व्हीसा यामुळे पर्यटनात मोठी वाढ झाली. साधनसुविध मजबूत बनविण्यासाठी खूप काम केले. मांडवी पूल, मोपा विमानतळ, दाबोळीचे काम, झुवारी पूल असे अनेक प्रकल्प दिले. पणजीत स्मार्टसिटीअंतर्गत काम केले. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी काम केले, असे मोदी म्हणाले.
गोवा हा माझ्यासाठी टर्निंग पाईंट आहे. पाच वर्षाअगोदर भाजप कार्यकारी समितीची गोव्यात बैठक झाली होती. याच बैठकीत आपल्याला पंतप्रदानपदाचा उमेदवार केले. त्यामुळे गोव्याशी आपले भावनिक नाते आहे. पाच वर्षाच्या कालावधीत जे आपण केले त्यामागे गोमंतकीयांचे आशीर्वाद आहेत, असेही मोदी म्हणाले.
मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात कोकणीतून केली. ‘सगळ्यां गोयकारांक मायेमोगाचो येवकार’ असे उद्गार काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला. शेवटी भाषण संपवतानाही ते कोकणीतून बोलले. आपल्यासोबत त्यांनी उपस्थितांना बोलायला लावले. गावागावात आसा चौकीदार, शहाराशहरात आसा चौकीदार, भुरगीबाळा चौकीदार, आयाबहिणी चौकीदार, घराघरांनी शेताखळ्यांनी चौकीदार, डॉक्टर, अभियंते, इंजिनियर्स, शिक्षक सगळेच चौकीदार. मोदी सुरूवात करायचे व उपस्थित चौकीदार म्हणून त्यांना प्रतिसाद द्यायचे.