पर्रिकर मंत्रीमंडळातून आजारी मंत्र्यांना वगळले;2 नव्या मंत्र्यांचा आज होणार शपथविधी

0
1371
 गोवा खबर:मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच कायम राहतील असा निर्णय काल भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केल्यानंतर आज मंत्रीमंडळा मधील 2 आजारी मंत्र्यांच्या जागी 2 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय भाजपने घेतला.
 पर्रिकर यांच्या मंत्रीमंडळात आज  2 नव्या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश होणार आहे.कुडचडेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त या कॅबिनेट दर्जाच्या पदावर असलेल्या मिलिंद नाईक यांचा आज   सायंकाळी राजभवनावर छोटे खानी सभारंभात शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री पर्रिकर यांनी गेले काही आजारी असलेले  वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि  नगर विकस मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना मंत्रीमंडळा मधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मडकईकर हे सध्या मुंबई येथे तर डिसोझा अमेरिकेत जेथे पर्रिकर यांनी उपचार घेतले होते त्याच हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत.
आजारी मंत्रीमंडळावरुन विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.सरकार आजारी पडले असून प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप करत भाजपला सरकार चालवणे शक्य होत नसेल तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे अनेकदा करत सरकार वरील दबाव वाढवला होता.
आता मंत्रीमंडळ फेर रचना आणि खाते वाटप केव्हा होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.मुख्यमंत्री पर्रिकर असले तरी हॉस्पिटल मधून उपचार घेऊन येईपर्यंत मंत्री मंडळामधील सर्वात ज्येष्ठ अर्थात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या मगोच्या सुदिन ढवळीकर यांच्याकडे दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री पदाची सुत्रे सोपवून सरकारच्या कामाला गती द्यावी अशी मागणी रेटून धरली आहे.कायमस्वरूपी तोडगा काढा अशी मागणी करणाऱ्या गोवा फॉरवर्डने मात्र ताप्तुरत्या तोडग्यावर समाधान व्यक्त केले आहे.