पर्रिकरांकडील राफेलच्या फाइल्स नेण्यासाठीच शहा गोव्यात; काँग्रेसचा आरोप

0
869

 

 गोवा खबर: राफेल डिल वरुन माजी संरक्षण मंत्री तथा गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरुच आहेत.पर्रिकर यांच्याकडील राफेलच्या फाइल्स नेण्यासाठीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गोव्यात आले होते असा दावा करत देश आणि गोवा का चौकीदार सुद्धा चोर आहे,असा आरोप आज काँग्रेसने केला.

काँग्रेस हाउस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी आज अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या गोव्याच्या दौऱ्याला राफेलशी जोडून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि पर्रिकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
देशप्रभू म्हणाले,गोव्यात अशी कोणतीच परिस्थिती नव्हती ज्यासाठी शहा यांना बाकी सगळी कामे बाजूला ठेवून गोव्यात यावे लागेल. पर्रिकर यांच्या बेडरूम मध्ये राफेल्सच्या फाइल्स आहेत,हे त्यांच्या मंत्र्याच्या ओडियो क्लिप वरुन जग जाहिर झाले आहे.उद्या पर्रिकर यांचे काही झाले तर आपली चोरी पकडली जाईल या भीतीने शहा यांनी गोव्यात येऊन पर्रिकर यांच्याकडील फाइल्स सोबत नेऊन सुरक्षित राहणे योग्य समजले असावे.
पर्रिकर यांच्या सोबत शहा यांनी तब्बल 45 मिनिटे चर्चा करण्यासारखी कोणतीच घटना गोव्यात घडली नव्हती, असे सांगून देशप्रभु म्हणाले,पर्रिकर यांच्या कडे राफेल्सच्या डर्टी फाइल्स असल्याने भजाप नेत्यांना त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवता येत नाही.त्यामुळे फाइल्स घेऊन स्वतः सुरक्षित झाल्यानंतर पर्रिकर यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवले तर आश्चर्य वाटायला नको.
संरक्षण मंत्री असताना पर्रिकर यांनी राफेल डीलबाबत असलेल्या त्रुटींवर पांघरुण घातले असा आरोप करून देशप्रभु म्हणाले,त्यामुळे देशचा चौकीदार चोर आहे असे आम्ही पूर्वी पासून म्हणत आलो आहोत.आता त्याला जोडून गोव्याचा चौकीदार सुद्धा चोर आहे असे म्हणावे लागते.