पर्यावरणा बरोबर मनुष्य जातीस हानिकारक कोळसा वाहतूक धोक्याची:आप

0
110
 गोवा खबर: राज्यातील वाढत्या कोळसा वापर व प्रदूषणाची दखल घेत आम आदमी पक्षाने  कोळसाविरोधी भूमिका घेतली आहे. जगभरातील देश कोळशाचा वापर कमी करण्यावर भर देत असताना  गोवा सरकार मात्र कोळसा आयातीचा मार्ग मोकळा करण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करत असल्या बद्दल आश्चर्य व्यक्त करत,हा प्रकार कोणाच्या फायद्यासाठी आहे,हे जनता जाणून आहे,अशी टिका आप नेते सिद्धार्थ कारापुरकर यांनी केली आहे.
 जो कोळसा प्रकल्प सरकार राज्यातील जनतेच्या माथी मारण्यासाठी आणत आहे त्याचा जर राज्याला कुठलाही फायदा असेल तर सरकारने दाखवून द्यावे,असे आव्हान कारापुरकर यांनी दिले.
कारापुरकर म्हणाले, पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या आमदारांच्या मदतीने व समन्वयाने उभे असलेले सध्याचे सरकार जनतेचे शत्रू झालेले आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याचा मुद्दा येतो, त्यावेळी जनतेचा कुठलाही कौल न घेता हे सरकार बड्या उद्योग समूहांना खुश करण्यासाठी राज्यातील लोकांशी अतिशय क्रूर पद्धतीने वागत असलेले पाहायला मिळत आहे.हे प्रकार लोकांच्या सहनशीलते पलीकडे गेले आहेत.
राज्यातील कोळशाच्या धंद्याला  लुईझिन फालेरो यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले आणि दुपदरीकरण अथवा डबल ट्रॅकिंग करण्याचा प्रस्ताव दिगंबर कामत यांच्याकडून पुढे रेटण्यात आला होता, याची आठवण करून देत कारापुरकर म्हणाले,आपने  नेहमीच  काँग्रेस आणि भाजप एक संयुक्त युती चालवीत असून या युतीचे नाव काँग्रेस जनता पार्टी  असे आहे. आता नुकत्याच काही दिवसांपासून या प्रकल्पांबद्दल हृदयपरिवर्तन होऊन काँग्रेसकडून त्यांना विरोध होण्याचा प्रकार म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार होय. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष गोवेकरांच्या भावनांशी खेळ करीत आहेत.
काँग्रेसने कोळसा वाहतुकीला परवानगी दिली. मुरगाव वास्को येथील भागामध्ये आजच्या घडीला फुफ्फुसांच्या आजारामुळे पीडित असलेल्या लोकांची 5 हजाराच्यावर प्रकरणे असल्याची माहिती समोर आली आहे. हे असेच चालू राहिले तर अशी हजारोंनी जास्त प्रकरणे पुढे होऊ शकतात व हजारोंच्या संख्येने लोक याला बळी पडू शकतात,याकडे कारापुरकर यांनी लक्ष वेधले.
आम आदमी पक्षाला नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे. सरकारने आता गोव्यातल्या लोकांचे आरोग्य आणि निसर्ग नष्ट करणे बंद केले पाहिजे. आता येऊ घातलेल्या डबल ट्रॅकिंग वा दुपदरीकरणामुळे कोळसा वापर व वाहतूक भरमसाठ वाढेल यामुळे संरक्षित असलेले जंगल नष्ट होईल. भगवान महावीर अभयारण्य, दूधसागर धबधबा, शंभर हून जास्त प्राण्यांच्या प्रजाती या सर्व जैवविविध संपदेला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो व ती नष्ट होऊ शकतात. झाडे आणि जलस्रोतही नष्ट होतील,अशी भीती कारापुरकर यांनी व्यक्त केली.
कोळशापासून निर्माण केल्या जाणाऱ्या ऊर्जेचा वापर जगात आज कमी केला जात आहे. त्यामुळे पुनर्वापर करता येणारे ऊर्जास्रोत आपण यापुढे वापरणे अत्यावश्यक आहे, अशी भूमिका आम आदमी पक्षाची असल्याचे कारापुरकर यांनी सांगितले.