पर्यटनमंत्र्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला:काँग्रेसचा आरोप

0
680
गोवा खबर : गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकरांच्या “मिशन ३० टक्के कमिशन” ने गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचा गळा घोटला आहे. मागील एका वर्षात गोव्यात १ कोटी ६० लाख पर्यटक बेकायदा वास्तव्य करुन गेले अशी जाहिर कबुली देणाऱ्या पर्यटन मंत्र्यानी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे, अशी टीका काॅंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. 
आज कायदेशीरपणे व्यवसाय करणारे हाॅटेल व्यावसायीक पर्यटन मंत्र्याच्या भ्रष्ट कारभाराने हवालदिल झाले आहेत. कोविड संकट काळातही त्यांच्याकडुन हप्ते गोळा करण्यासाठी पर्यटन खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी व बाबू आजगावकरांचे हस्तक तगादा लावत असल्यानेच, सरकारने हाॅटेल्स खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही गोव्यातील सुमारे ३५९९ नोंदणीकृत हाॅटेल्स पैकी केवळ २५० हाॅटेल्सनी परवानगीसाठी अर्ज केला. हाॅटेल्सच्या खोलींचे भाडे वाढवुन आपणाला  कमिशन द्या  अशी मागणी बाबू आजगावकरांनी हाॅटेल व्यावसायीकांकडे  केली आहे. मुख्यमंत्री व भाजप पक्षाला त्यातला  हप्ता मिळत असल्यानेच बाबू आजगावकरांना त्यानी लुटमार करण्यासाठी परवानगी दिली आहे,असा आरोप पणजीकर यांनी केला आहे.
ट्रॅव्हल व टुरीजम संघटनेने पर्यटन खात्यातील एका अधिकाऱ्याच्या नावासकट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करुन,  आजगावकर ३० टक्के कमिशन मागत आहेत अशी लेखी तक्रार केली होती. परंतु, डाॅ. प्रमोद सावंत यानी आपली खुर्ची सांभाळण्यासाठी ते पत्र कपाटात बंद करुन ठेवले आहे असा आरोप  पणजीकर यांनी केला आहे.
बाबू आजगावकरांच्या आशिर्वादाने बेकायदा व अनधिकृत निवास व्यवस्था व बेकायदा हाॅटेल्स गोव्यात चालत आहेत.  सरकार जाणीवपुर्वक या बेकायदा व्यवसायाकडे दुर्लक्ष करीत आहे. खुद्द पेडणे तालुक्यात अनेक विदेशी नागरीक बाबू आजगावकरांना कमिशन देऊन हा व्यवसाय करीत आहेत,असा आरोप देखील पणजीकर यांनी केला.
८ एप्रिलच्या गोवा मंत्रीमंडळ बैठकीत कोरोना लाॅकडाऊन काळात सुमारे ६७५ पर्यटक  गोव्यात असल्याची माहिती अधिकृतपणे मांडण्यात आली होती. त्यात केवळ ८६ देशी पर्यटक होते.  सदर बैठकीत गोव्यात ५८९ विदेशी पर्यटक असल्याची माहिती देण्यात आली होती व त्या सर्वाना त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी सरकार पाऊले उचलणार असे मुख्यमंत्र्यानी सांगीतले होते.
परंतु, लाॅकडाऊन काळात गोव्यातुन सुमारे ४३ विमानातून ९०४० पर्यटक आपल्या मायदेशी परत गेल्याचे गोवा विमानतळ प्राधिकरणाने ३० जून रोजी २०२० रोजी जाहिर केले आहे. त्यामुळे ८४५१ विदेशी पर्यटक गोव्यात अनधिकृत व बेकायदा निवासात वास्तव्य करुन होते हे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच सरकारी आकड्यापेक्षा बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांची संख्या पंधरा पटीनी जास्त असल्याचे उघड होत आहे,याकडे पणजीकर यांनी लक्ष वेधले.
कोरोना लाॅकडाऊन काळात पर्यटन मंत्री बाबू आजगावकरांनी पर्यटन व्यवसायाला पुर्नजीवीत करण्यासाठी सर्वेक्षण करण्याची घोषणा केली होती. परंतु सदर सर्वेक्षण आधीच संशयाच्या घेऱ्यात असलेल्या पर्यटन खात्याची सल्लागार कंपनी केपिएमजीने केल्याने त्याच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर केपिएमजी कंपनी केवळ “काॅपी-पेस्ट” करुन पर्यटनाचा मास्टर प्लॅन बनविण्याच्या नावाखाली सरकारचे कोट्यावधी रुपये लुटते अशी टिका भाजपच्याच आमदार ग्लेन टिकलो व इतर आमदारानी विधानसभेत केली होती व मुख्यमंत्र्यानी सदर कंपनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आता त्यानाच कंत्राट दिल्याने मुख्यमंत्र्यानाही केपिएमजीने गुंडाळले आहे का, असा संशय पणजीकर यांनी व्यक्त केला आहे.
गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला खऱ्या अर्थाने उभारी द्यायची असल्यास, बाबू आजगावकराना ताबडतोब डच्चू देणे गरजेचे असुन, ते जेवढा काळ त्या पदावर राहतील तोपर्यंत पर्यटन व्यवसाय रसातळालाच जाणार आहे,असे पणजीकर म्हणाले.