पर्यटकांना लूटणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करा:शिवसेना

0
1565
पणजी:कळंगुट, कांदोळी भागात एक अवैध प्रकार करून पर्यटकांना ब्लैकमेल करून लुटणारी टोळी वावरत आहे.पोलिसांनी या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी  शिवसेना प्रवक्ता जितेश कामत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
कामत म्हणाले, या टोळीचा एक माणूस पर्यटकांना गाठून स्वतः गाईड असल्याचे सांगत रूम, मसाज पार्लर वैगेरेचे आमिष दाखवतो.  थोडा अंधार झाल्यानंतर पर्यटकांना एका गुप्त ठिकाणी घेऊन जातो. आदर सत्काराच्या निमित्ताने गुंगीचे औषध मिसळलेले पेय पाजतो. मग त्यांची अर्ध बेशुद्ध अवस्थेत मुलींसमवेत अश्लील फोटो काढतो.नंतर शुद्धिवर आल्यावर त्यांना ते दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी देत पैसे उकळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पर्यटकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डचा पासवर्ड घेऊन पैसे काढून घेतले जातात. उपलब्ध माहिती नुसार पुरूष व महिला मिळून १५ ते२० जणांची टोळी त्या खोलीत असते.
पर्यटकांना मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवण्यात  येतो, असे सांगून कामत म्हणाले,पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास पर्यटक घाबरतात. ह्या सर्व प्रकारातून गोव्याची बदनामी होत असून गोवेकरांबद्दल सूडभावना निर्माण होते. आताच्या युगात आम्ही गोवेकर बहुतेक ठिकाणी स्वतःच्या गाडीने सफारीला जातो तेव्हा सुड भावनेतून आम्हालाही लक्ष्य केले जाऊ शकत असल्याने सरकारने ही बाब गांभिर्याने घ्यावी. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल ठोस पावले उचलण्याची गरज आहे,असे मत कामत यांनी व्यक्त केले. शिवसेना पदाधिकारी आइजीपीना भेटुन उपलब्ध असलेली अधिक माहिती पूरवणार असून त्याच्या आधारे त्या टोळीला पकडता येऊ शकेल असा दावा कामत यांनी केला आहे. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी गोव्यात पर्यटकांसाठी हंगामी काळ असल्याने पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी कामत यांनी केली आहे़.यावेळी सहसंपर्क प्रमुख आदेश परब, उत्तर जिल्हा प्रमुख किशोर राव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य परीमल पंडित आणि बार्देश तालुका प्रमुख परेश पानकर हजर होते.