पर्यटकांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज;उद्या पासून सुरु होणार हॉटेल्स

0
484
गोवा खबर:कोरोना लॉक डाउनमुळे घरात राहून कंटाळला असाल आणि जीवाचा गोवा करायचा विचार मनात येत असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.  गोव्यात 22 मार्च पासून बंद असलेली हॉटेल्स उद्या गुरुवार 2 जुलै पासून सुरु होणार आहेत.
मंत्रीमंडळ बैठकी नंतर पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी याबद्दल माहिती दिली. पर्यटकांना गोव्यात येण्यासाठी हॉटेल्सची नोंदणी आगावू केलेली असणे गरजेचे आहे.त्याशिवाय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून कोविड निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र आणावे लागेल किंवा त्यांची गोव्यात चाचणी केली जाईल,त्यात निगेटीव्ह आल्यास गोव्यात फिरता येईल आणि पॉझिटीव्ह आल्यास त्याना परत धाडले जाईल,असे पर्यटनमंत्री  आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
जवळपास अडीचशे हॉटेल्सनी आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्ज दिले आहेत.ज्यांची नोंदणी पर्यटन खात्याकडे आहे त्यांनाच हॉटेल्स सुरु करता येणार असून कोणी बेकायदेशीर हॉटेल्स सुरु केल्यास त्यांच्यावर कारवाई, होईल, असा इशारा पर्यटनमंत्री आजगावकर यांनी दिला आहे.
राज्यात सध्या वाइन शॉप आणि रेस्टोरेंट सुरु आहेत.उद्या पासून हॉटेल्स सुरु होणार आहेत.यापार्श्वभूमीवर बार सुरु करण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी होत आहे.सरकार त्यावर विचार करत असून लवकरच त्याबाबत निर्णय होईल,असे आजगावकर म्हणाले.
हॉटेल्स मध्ये येणाऱ्यांकडे कोविडच्या पार्श्वभूमीवर एक अर्ज भरून घेतला जाणार असून हॉटेल्स चालकांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागणार आहे,असे आजगावकर म्हणाले.