परिक्रमा म्हणजे ज्ञाननिर्मितीची प्रक्रियाच : युगांक नायक

0
806

 

 

गोवा खबर:युवा प्रतिभेला चालना देणारे विविध कार्यक्रम, उत्सव, महोत्सव गोव्यामध्ये सातत्याने होत असले तरी, ‘परिक्रमा’ हा यासगळ्यांपेक्षा आचार, विचार आणि स्वरुपापासून संपूर्ण वेगळा उपक्रम आहे. आणि हे वेगळेपण आम्ही पहिल्या वर्षांपासूनच कायम राखले आहे. ‘परिक्रमा’चा उद्देश ‘उत्सव’ साजरा करण्याचा नसून, गोव्यामध्ये तरुणांच्या माध्यमांतून बहुविध प्रकारची आणि चिरंतन स्वरुपाची ज्ञाननिर्मिती करण्याचा आहे. गेल्यावर्षी झालेल्या झीरो पॉइंट वन आणि नुकताच झालेला झीरो पॉइंट टू या दोन्ही उपक्रमामध्ये सहभागी स्पर्धकांसोबत आम्ही हे उद्दीष्ट साध्य करण्याच्याच दिशेने यशस्वी वाटचाल करत असल्याचेच प्रत्ययास येत आहे, असे या ज्ञानमहोत्सवाचे मुख्य संयोजक युगांक नायक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

12 आणि 13 जानेवारी रोजी माशेल येथे आयोजित ‘परिक्रमा 0.2’ आणि तत्पूर्वी डिसेंबरमध्ये आयोजित ‘अ‍ॅकेडॅमिक फोरम’चा आढावा मांडण्यासाठी गोवा कला अकादमी येथे आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये ‘परिक्रमा 0.2’च्या अध्यक्षा श्रुती भोसले, कार्याध्यक्ष प्रज्योत चोडणकर, सुरेल तिळवे, स्नेहा नायक, उर्वशी नायक यांची मंचावर उपस्थिती होती.

परिक्रमा 0.2मध्ये शाश्वत ज्ञाननिर्मितीसाठी पोषक अशा 27 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पणजी, फोंडा, वास्को, डिचोली आदीं विविध शहरांमध्ये सुमारे 15 ठिकाणी या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये राज्यभरातून मोठ्याप्रमाणात तरुणांनी सहभाग नोंदवला. यासाठी 30 हून अधिक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले तर 60 हून अधिक परिक्षकांनी परिक्षण केले. यावर्षी परिक्रमामध्ये स्पर्धक, आयोजक आणि परिक्षक अशा सर्व विभागांमध्ये किमान 33 टक्के महिलांचा सहभाग अनिवार्य केला होता, पण स्पर्धा संपल्यानंतर घेतलेल्या ताळेबंदामध्ये हा आकडा 50 टक्क्यांपर्यंत गेल्याचे युगांक नायक यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

 

 

 कोकणी बोलीभाषेचे केले ‘व्हिडिओ डॉक्युमेटेंशन’

परिक्रमा 0.2 मध्ये यावर्षी गोव्यातील प्रांतवार समाज : बोली व जीवन या विषयावर आधारित माहितीपट स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये दहा विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यातील एकेक समाज आणि त्यांची बोलीवैशिष्टे टिपून माहितीपट तयार केला आहे. त्याचप्रमाणे स्थानिक विषयांवर अर्थपूर्ण आणि मूळ माहितीने परिपूर्ण असा ब्लॉग तयार करण्याच्या स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शिरोडा, सावयवेरे, भतग्राम, वास्को द गामा, मये या परिसरांची माहिती देणारे ब्लॉग तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

 

कोकणी साहित्य पोहोचवणार इंग्रजीत

स्पर्धांमध्ये यावर्षी साहित्य अकादमीप्राप्त ज्येष्ठ कोकणी लेखिका शीला कोंळबकर या ‘गॅरर्र’ या कथासंग्रहातील कथांचा इंग्रजी अनुवाद करण्याचीही स्पर्धा होती. यामध्ये आठ स्पर्धकांनी या कथासंग्रहातील कथा उत्तमरित्या इंग्रजीमध्ये अनुवाद केल्या असून त्यावर योग्य ते संपादकीय संस्कार करून त्या अनुवादित कथांचे पुस्तक प्रकाशित करून ते देशभरात वितरित करणार असल्याचेही यावेळी युगांक यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांसाठी घेतलेल्या शोधनिबंध आणि बिगर शैक्षणिक संस्थांसाठीच्या मोनोग्राफ स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून गोव्यातील वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी, गोव्याची जमीन : विस्थापन, पुर्नवसन, धोरण, कोकणी चित्रपट : सौदर्यंशास्त्र आणि अर्थशास्त्र आदींसह विविध विषयांवर शोधनिबंध तसेच डॉ. शिरोडकर, शांती घाटवळ, राजेंद्र केरकर, जयेश राऊत यांच्यासह विविध व्यक्तिरेखांवर मोनोग्राफ लिखाण करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. हे सर्व लिखाण कोकणीतील पहिल्यावहिल्या प्रस्तावित ‘जर्नल’ अंकामध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याचे नमूद केले.

 

 

यावर्षीचा परिक्रमा 0.2 अपेक्षेप्रमाणे अधिकाधिक उत्साह वाढवणारा आणि गोव्यामध्ये सकस माहिती, ज्ञान निर्मिती करणारा झाला. गेल्या दोन वर्षांमध्ये आमच्याकडे 25 शोधनिबंध, 27 मोनोग्राफ, 30 एकांकिका, 29 शैक्षणिक माहितीपट, 20 साहित्य समिक्षा, 42 कांतारा, 10 विज्ञानिक निबंध आणि 16 अनुवाद एवढा ठोस मजकूर जमा आहे. हे सगळे साहित्य विषयानुरुप आम्ही पुस्तकरुपात प्रकाशित करणार आहोत. त्यामुळे गोव्याबद्दल अधिक जाणून घेणार्‍यांसाठी तो महत्वाचा दुवा ठरू शकेल.

 

– युगांक नायक,

मुख्य संयोजक, परिक्रमा 0.2