परराज्यातील बेकायदा बसेसचे रॅकेट उध्वस्त करा:शिवसेना

0
846
गोवा खबर :अरूणाचल प्रदेश, नागालँड, पाँडीचरी, उत्तर प्रदेशमधून गोव्यात येऊन  गोवा- मुंबई मार्गावर बेकायदा वाहतूक करणाऱ्या बस गाड्या त्वरित बंद करण्याची मागणी शिवसेनेचे प्रवक्ते जितेश कामत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. अशी वाहतूक करणे पुर्णपणे बेकायदेशीर असून सदर बसेस नोंदणीकृत राज्यात जाणे अनिवार्य आहे पण सगळे नियम धाब्यावर बसवून वाहतूक सुरु असल्याचा दावा कामत यांनी केला. गोव्याच्या बस व्यवसायीकांना या प्रकारामुळे जबरदस्त फटका बसत असून त्यांच्यावर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे याकडे कामत यांनी लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख किशोर राव यांनी वाहतूक खात्याच्या सहाय्यक संचालकांची  भेट घेऊन निवेदन सादर केले होते पण वाहतूक खाते सुस्त असल्याने अद्याप पर्यंत ठोस कारवाई न झाल्या बद्दल कामत यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आम्ही काही शिवसैनिकांना आणि बस व्यवसायीकांना बरोबर घेऊन धारगळ चेकपोस्ट येथे उपस्थित वाहतूक निरीक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार आणुन दिला होता तेव्हा काही बसगाड्यांना दंड ठोठावण्यात आला होता असे सांगून कामत म्हणाले, सरकारने या प्रकरणात जातीने लक्ष घालून सदर बसगाड्या बंद करण्याची गरज आहे.
सावंतवाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी उपस्थित पत्रकारांनी बांबोळी येथील गोमेकॉत परप्रांतीय रुग्णांसाठी लागु केलेल्या शुल्काविषयी प्रश्न केला असता  मायनिंगच्या माध्यमातून येणारे उत्पन्न कमी झाल्याने तसेच जीएसटीच्या घोळामुळे राज्य चालवण्यासाठी येणारा पैसा कमी झाला असून नाईलाजाने रूग्णांना शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले,ही बाब गंभीर असून कामत यांनी ढवळीकर यांच्या विधानाचा समाचार घेऊन त्यांच्यावर  टिका केली.  मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीच्या विरूध्द त्यांचेच मंत्री बोलत असून मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील जनतेला स्पष्टीकरण द्यावे,अशी मागणी कामत यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी पूरवलेल्या माहितीनुसार २०१७ जुलै ते ऑक्टोबर दरम्यान जीएसटीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा महसूल गोव्याला मिळाला आहे. नेहमीप्रमाणे एक तर मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत किंवा त्यांच्या सहवासात राहुन ढवळीकर खोटे बोलत आहेत त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी कामत यांनी केली.यावेळी उत्तर जिल्हा प्रमुख किशोर राव आणि फोंडा तालूका प्रमुख घनश्याम नाईक परिषदेस उपस्थित होते.