परतीच्या पावसाने झोडपले

0
624
 गोवा खबर:मान्सून अधिकृतपणे देशातून माघारी फिरल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने करताच आज सायंकाळी आलेल्या परतीच्या पावसाने गोव्याला झोडपून काढले.
विजांचा लखलखाट,ढगांचा गडगडाट करत वादळी वाऱ्यासह आलेल्या परतीच्या पावसाने गोव्याला आज सायंकाळी झोडपून काढले.
राजधानी पणजी मधील अनेक रस्ते दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जलमय झाले होते.वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे, वीजेचे खांब पडून नुकसान झाले.
चार वाजता सुरु झालेल्या मुसळधार पावसाने जवळपास दोन तास धुमाकुळ घातला.
भारतीय हवामान खात्याने मान्सून देशातून अधिकृतपणे माघारी फिरल्याचे जाहीर केले. गेले काही दिवस राज्यात ठीकठिकाणी परतीचा पाऊस पडत आहे.काल म्हापशात गारांसह जोरदार पाऊस पडला होता.
वीज पडून केपेत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू
दक्षिण गोव्यातील केपे तालुक्या मधील बार्शे येथे शेतात गेलेल्या 40 वर्षीय महिलेवर वीज पडून तिचा मृत्यू झाला.
वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव पुष्पा वेळीप असे आहे. ती आज सायंकाळी शेतात गेली असताना तिच्यावर वीज कोसळली.वीजेच्या झटक्याने पुष्पा यांचा मृत्यू झाला.पुष्पा यांच्या सोबत असलेली दूसरी महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर काणकोण येथील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.
गेल्या आठवडयात कांदोळी किनाऱ्यावर वीज पडून दिल्ली येथील पर्यटकाचा मृत्यू झाला होता.त्यानंतर आज दुसऱ्या घटनेत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
आज सायंकाळी वीजांच्या लखलखाटा आणि ढगांच्या गडगडाटा सोबत आलेल्या वादळी परतीच्या पावसाने गोव्याला झोडपून काढले.झाडे आणि वीजेचे खांब कोसळून अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे वृत्त आहे.