पत्र सूचना कार्यालयाकडून संपादक परिषदेचे आयोजन

0
649

 

 

गोवा खबर:पत्र सूचना कार्यालयाकडून आज राज्यात प्रथमच संपादकांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील मुद्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांनी या परिषदेत सहभाग घेतला. पत्रकारिता, माध्यमे तसेच राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या मुद्यांवर या परिषदेत तपशीलवार सादरीकरण करुन उहापोह करण्यात आला.

गोवा विभागाचे पोस्ट मास्तर जनरल डॉ एन विनोदकुमार यांच्या हस्ते संपादक परिषदेचे उदघाटन करण्यात आले. गोवा माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संचालक श्रीमती मेघना शेटगावकर, पत्र सूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती अर्मेलिंदा डायस, पत्र सूचना कार्यालयाचे उप संचालक श्री विनोदकुमार यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

इंग्रजी दैनिक हेराल्डचे संपादक अलेक्झांडर बार्बोसा यांनी राज्यातील पर्यावरणीय समस्या या विषयावर सादरीकरण केले. तर, द टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक राजेश मेनन यांनी टॅक्सी, कचरा, आणि ड्रग्जचा विळखा या विषयावर सादरीकरण केले. प्रत्येकाने राज्याच्या विकासात सहभाग नोंदवण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

तरुण भारत, गोव्याचे संपादक सागर जावडेकर यांनी स्थलांतरितांच्या मुद्यावर सादरीकरण केले. स्थलांतर ही समस्या नसून कौशल्य संपादन करण्याची संधी आहे, असे जावडेकर म्हणाले. राज्याच्या विधानसभेत या विषयावर झालेल्या चर्चांचा तपशीलही त्यांनी आपल्या सादरीकरणात मांडला.

नवप्रभा दैनिकाचे संपादक परेश प्रभू यांनी मराठी आणि कोकणी भाषेतील पत्रकारिता आणि नवमाध्यमे या विषयावर आपले मत मांडले. पत्रकारितेने आपले तत्व पाळून काळासोबत बदलले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. तसेच समाजमाध्यम ही काळाची गरज आहे, त्याचा योग्य वापर केला पाहिजे, असे ते म्हणाले.

पणजी दूरदर्शनचे उपसंचालक रवीराज सरतापे, पणजी आकाशवाणी केंद्राच्या प्रमुख श्रीमती मिनाक्षी बॅनर्जी, इन्क्रीडेबल गोवाचे संपादक राजेश घादगे, बिझनेस गोवाचे संपादक हर्ष भटकुळे, गोवा-365 वाहिनीचे संपादक संदेश प्रभूदेसाई, भांगरभूईचे संपादक दामोदर घाणेकर यांनीही संपादक परिषदेत सादरीकरण केले.

राज्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेबद्दल संपादकांनी पत्र सूचना कार्यालयाचे कौतुक केले. तसेच विचारांची आदान-प्रदान होण्यासाठी विविध विषयांवर अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे विचार संपादकांनी व्यक्त केले.