पणजी स्मार्ट सिटी करून पर्रिकर यांचे स्वप्न पूर्ण करूया:मुख्यमंत्री

0
768
 गोवा खबर:पणजी जागतिक दर्जावर चांगली स्मार्ट सिटी करण्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न आता आम्हाला पूर्ण करायचे आहे,असे आश्वासन देत पणजीचे भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी आपला जाहीरनामा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते नुकताच प्रसद्ध केला.
 यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि माजी महापौर अशोक नाईक यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कुंकळ्येकर म्हणाले, गेली 25 वर्षे आम्ही पर्रीकर यांना निवडून दिले आहे. त्यांच्या काळात मोठ्याप्रमाणात विकास झाला आहे. पर्रीकर यांनी समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवल्या. पणजी हे जागतिक दर्जाचे स्मार्ट शहर करण्याचे पर्रीकर यांचे स्वप्न आता आम्हाला पूर्ण करायचे आहे.
कुंकळ्येकर यांनी आपल्या जाहीरनाम्यात पायाभूत सुविधा, पार्किंग आणि वाहनांची गर्दी कमी होण्यासाठी उपाय योजना तसेच आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण, सुविधा आणि उपयुक्तता, रोजगार, युवा आणि महिला सशक्तीकरण, कचरा प्रकल्प, पाणी पुरवठा आणि सीवरेज, पणजी मार्केट नूतनीकरण व पर्यटन आणि खेळ आदी विषयां बाबत आश्वासने दिली आहेत.
काँग्रेस पक्षाला स्वतः घोटाळे करुन इतरांवर आरोप करण्याची सवय आहे,असा आरोप करून मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, जर त्यांना वाटत असेल की स्मार्ट सीटीबाबत काही घोटाळा झालेला आहे तर त्यांनी तसे पेपर दाखवून तो सिद्धा करावा. त्यांना हवे असल्यास मी सर्व दस्तएवज दाखवायला तयार आहे. फक्त त्यासाठी त्यांना आपल्या कार्यालयात यावे लागेल.  जाहीरनाम्यात पर्रीकर यांच्या स्वप्नातील पणजी आहे. पर्रीकर यांचे अपूर्ण राहीलेले स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहे व त्यासाठी कुंकळ्येकर यांना निवडून द्या.