पणजी येथे टपाल भवनाचे उद्घाटन

0
1427

गोवा खबर:भारतीय टपाल सेवा, गोवा विभागातर्फे उभारण्यात आलेल्या ‘टपाल भवन’ या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. ईडीसी कॉम्लेक्स, पाटो येथे हे भवन असून म्हापसा तसेच पणजी येथून चालणारे प्रशासकीय काम आता या टपाल भवनातून होईल. त्यामुळे म्हापसा येथील वरिष्ठ अधीक्षक व पणजी येथील पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय या भवनामध्ये एकत्रितरीत्या काम करेल.

याप्रसंगी महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ईडीसी कॉम्लेक्स, पाटो येथे अनेक सरकारी तसेच खाजगी कंपन्यांची कार्यालये असल्याने टपाल भावन या परिसरात असणे महत्वाचे असल्याचे यावेळी ते म्हणाले. या भवनामध्ये तळ मजल्यावर पोस्ट ऑफिस असून सर्व प्रकारच्या टपाल सेवा येथून पुरविण्यात येणार आहेत. ‘इंडिया पोस्ट बँके’ला सक्षम करण्यावर आमचा भर आहे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय पासपोर्ट साठीची सेवा देखील आता पोस्ट ऑफिस मधून देण्यात येत आहे. तसेच भारतीय टपाल खात्याची पार्सल सेवा अतिशय सक्षम असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

 

पोस्टाच्या एटीएम सुविधेबद्दल सांगताना त्यांनी माहिती दिली कि, पोस्टाचे एटीएम कार्ड कुठल्याही बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये काम करू शकते; याशिवाय पोस्टमन्सकडे मोबाईल सारखे एटीएम मशीन देण्यात आले आहे, यामुळे ग्राहकांना एटीएम सेंटर वर जाण्याची गरज नाही, हि सेवा आपल्याला घरपोच मिळू शकते; ही एक क्रांतिकारी सेवा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच ‘आधार एनेबल सिस्टीम’ मुळे एटीएम कार्डची देखील आवश्यकता राहणार नाही व ग्राहक आपल्या बोटांच्या ठश्यांनी एटीएम सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

गोवा विभागाचे पोस्टमास्तर विनोद कुमार यांनी यावेळी टपाल भवनामध्ये सौर उर्जेचा वापर होणार असल्याची माहिती यावेळी दिली.

SHARE
Previous article
Next articlecrime news