पणजी मनपा मार्केट उद्यापासून सुरु होणार:महापौर

0
424
 गोवा खबर:कोरोना लॉक डाऊनमुळे गेले 43 दिवस बंद असलेले पणजी येथील मनपा मार्केट उद्या पासून सुरु होणार आहे.महापौर उदय मडकईकर आणि बाजार समिती अध्यक्ष शेखर डेगवेकर यांनी आज याची माहिती दिली.
उद्या पासून मार्केट सुरु होणार असल्याने काल पासून मार्केट मध्ये सॅनिटायझेशन,साफ सफाई आणि रंग रंगोटीची कामे हाती घेण्यात आली आहेत.आज मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर ग्राहकांना रांगेत राहण्यासाठी चौकोन आखण्यात आले.
मार्केट मध्ये जाण्यासाठी फक्त एकच दरवाजा उघडला जाणार आहे.एकावेळी फक्त 50 लोकच मार्केट मध्ये जाऊ शकणार आहेत.
भाजीपाला आणि फळ विक्रेते जे आइनॉक्स रस्त्यावर बसत आहेत,त्यांना तेथेच बसावे लागणार आहे.बाकी मार्केट मधील सगळी दुकाने सुरु करता येणार आहेत.सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंतच मार्केट सुरु असणार आहे.मार्केट मध्ये दुकानदार, कामगार आणि ग्राहकांना मास्क घालणे आणि शारीरिक दूरी राखणे बंधनकारक असणार आहे.तंबाखू खावून थूंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून पान आणि तंबाखूजन्य पदार्थ विकताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
26 मे पासून पुरुमेंत फेस्त
म्हापसा येथील मुख्य बाजार बंद असल्याने पुरुमेंत करणाऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी 26  ते 31मे दरम्यान सीने नॅशनल रस्त्यावर पुरुमेंत फेस्त भरवले जाणार आहे.त्यासाठी ग्रामीण गोमंतकीय उत्पादकांनी उद्या पासून नाव नोंदणी करावी,जास्तीत जास्त 50 जणांना तेथे दुकान थाटण्यासाठी जागा दिली जाईल,अशी माहिती महापौर मडकईकर यांनी यावेळी दिली.