पणजी मधला पर्रिकरांचा गड मोन्सेरात यांनी केला काबिज

0
1270
गोवा खबर : गोव्यात भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या चारपैकी तीन जागांवर निर्णायक आघाडी घेऊन विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गेली 25 वर्षे भाजपचा गड बनवलेला पणजी मतदारसंघ भाजपला वाचवता आला नाही.  मांद्रे, शिरोडा व म्हापसा या तीन मतदारसंघांमध्ये भाजपाने निर्णायक आघाडी घेतली आहे.
 मांद्रे, शिरोडा, म्हापसा व पणजी या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका झाल्या होत्या. पणजीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे तर म्हापशात माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली.
या पोटनिवडणुकीत भाजपाविरुद्ध काँग्रेस, अशी जोरदार टक्कर झाली. म्हापसा व पणजी हे भाजपचे बालेकिल्लेच बनले होते. त्यापैकी पणजीच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने सुरूंग लावला. बाबुश मोन्सेरात यांना काँग्रेसने तिकीट दिल्याने पणजीत भाजपला पराभव सहन करावा लागला. पर्रीकर यांना जर वगळले तर भाजपा म्हणजे काहीच नव्हे, अशी प्रतिक्रिया मोन्सेरात यांनी जिंकल्यानंतर व्यक्त केली.
शिरोडा मतदारसंघात भाजपविरुद्ध महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अशी जोरदार लढत झाली. शिरोडयात काँग्रेस पक्षाचे उमेदवार महादेव नाईक हे तिस-या स्थानावर आहेत. भाजपच्या सुभाष शिरोडकर यांना फक्त 66 मतांची आघाडी मिळाली आहे. मगो पक्षासाठी हा फार मोठा धक्का ठरला आहे. कारण मगोपने भाजपविरुद्ध शिरोडा मतदारसंघात उमेदवार उभा करू नये अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मगोपला केली होती. मगोपने शिरोडयात उमेदवार उभा केल्यानेच सुदिन ढवळीकर यांना भाजपने मंत्रिमंडळातून डच्चू दिला होता. ढवळीकर त्यावेळी भाजपप्रणीत आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री होते. मगोपने उपमुख्यमंत्रीपदही गमावले. तसेच मगोपचे दोन आमदारही फुटून भाजपमध्ये गेले. सुदिन ढवळीकर आता एकाकी पडले आहेत. त्यांचे बंधू तथा मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांचा हा सलग दुसरा पराभव आहे.
म्हापशात फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांनी काँग्रेसला टक्कर देण्यात यश मिळविले. मांद्रे मतदारसंघात भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांना अपक्ष उमेदवार जित आरोलकर यांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सोपटे यांना यशस्वी होण्यापासून कोणच रोखू शकणार नाहीत,अशी सध्याची परिस्थितीती आहे.