पणजी भाजप मंडळ अध्यक्ष दीपक म्हापसेकरांच्या संपत्तीची चौकशी करा: गोवा सुरक्षा मंचची मागणी

0
1003
गोवा खबर:पणजीचे भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि पणजी भाजप मंडळ अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांनी साटेलोटे करून संपत्ती जमवली आहे.त्यामुळे दोघांच्या संपत्तीची चौकशी व्हावी,अशी मागणी आज गोवा सुरक्षा मंचच्या वतीने करण्यात आली.
येथील डेल्मन हॉटेल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत गोवा सुरक्षा मंचचे नेते शैलेश वेलिंगकर यांनी पणजी भाजप मंडळ अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या बरोबर त्यांना साथ देणाऱ्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची चौकशी व्हावी,अशी मागणी केली.
पणजी भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी गोवा साधन सुविधा विकास महामंडळाची कामे निकष डावलून दीपक म्हापसेकर आणि त्यांच्या खास मर्जी मधील लोकांना दिली आहेत.शिकक्षकेतर कर्मचारी असलेल्या म्हापसेकर यांनी गेल्या काही वर्षात कमावलेली मालमत्ता पाहता त्याचा मेळ त्यांच्या उत्पन्नाशी बसत नाही.त्यामुळे म्हापसेकर आणि त्यांना मदत करणाऱ्या कुंकळ्येकर यांची चौकशी व्हायला हवी,अशी मागणी वेलिंगकर यांनी आज केली.सर्व निकष डावलून सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची स्मार्ट सिटीवर नियुक्त केल्याचे सांगून भाजप आणि मोन्सेरात गटाचे वर्चस्व असलेल्या पणजी मनपाला पणजीचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.
काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात आणि भाजप यांचे साटेलोटे जगजाहीर आहे.पणजी मतदारसंघ राखून ठेवण्यासाठी ताळगाव मतदार संघ भाजपने बाबुशच्या हवाली केला आहे.ही गोष्ट सगळे लोक जाणून आहेत.त्याशिवाय पणजी मनपा आणि ताळगाव पंचायती मध्ये विरोधकाची भूमिका न बजावता भाजपने मोन्सेरात यांना रान मोकळे करून दिले आहे.भाजप आणि मोन्सेरात यांच्याकडून भ्रष्ट राजकारण सुरु आहे.पणजीच्या मतदारांना त्याची कल्पना असल्याने स्वच्छ राजकारण करू इच्छीणाऱ्या गोवा सुरक्षा मंचच्या सुभाष वेलिंगकर यांना मतदार निवडून देतील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेला हृदयनाथ शिरोडकर,महेश म्हांबरे,चंदन आमोणकर उपस्थित होते.