पणजी पोटनिवडणुकीसाठी 75.25 टक्के मतदान

0
623
पणजी:माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 75.25 टक्के मतदान झाले.किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.या पोटनिवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लोकसभेच्या निवडणुकांबरोबर जाहीर केला जाणार आहे.
 एकूण 22 हजार 482 पैकी 8 हजार 119 पुरुषांनी तर 8,799 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.महिला आणि पुरुष मिळून एकूण 16 हजार 918 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. पणजी मतदारसंघात एकूण
115 दिव्यांग मतदार नोंदणीकृत होते.त्यापैकी 101 जणांनी मतदान केले.त्याची सरासरी 87.82 टक्के आहे.
 सर्वाधिक मतदान 16 नंबर मतदान केंद्रावर 89.86 टक्के तर सर्वात कमी मतदान 15 नंबर मतदान केंद्रावर  63.96 टक्के झाले.
पणजी पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली.गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी मतदान केंद्र 9 वर मतदान केले.भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी जुंता हाउस मधील 21 नंबरच्या मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी रायबंदर येथील मतदान केंद्र 1 वर जाऊन मतदान केले.
आपचे वाल्मिकी नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांचे मतदान पणजी मतदारसंघात नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही.
सकाळी 9 वाजे पर्यंत पहिल्या 2 तासात 14.36 टक्के मतदान झाले.सकाळी 11वाजे पर्यंत मतदानाची टक्केवारी 31.93 टक्के पर्यंत गेली.यादरम्यानच्या काळात मतदान केंद्र 9 वरील व्हीव्हीपॅट मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे जवळपास 20 मिनिटे मतदान थांबवावे लागले होते.त्यानंतर मशीन बदलून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्यात आली.
सकाळच्या सत्रात तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक मतदाना साठी बाहेर पडलेले दिसून आले.15 नंबर मतदान केंद्रावर 102 वर्षाच्या मारिया नावाच्या महिलेने मतदानाचा हक्क बजावला.
दुपारी 1 वाजेपर्यंत 45.78 टक्के मतदानाची नोंद झाली होती.पणजी  मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रे दिव्यांग फ्रेंडली बनवण्यात आली होती.115 दिव्यांगां पैकी जास्तीत लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.मिनेझिस ब्रागांझा मधील साहित्य सेवक मंडळा मधील 7 नंबरच्या मतदान केंद्राची सगळी जबाबदारी दिव्यांग कर्मचाऱ्यांनी हाताळली.