पणजी पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला

0
1553
गोवा खबर:पणजी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे बाबुश मोन्सेरात आणि गोवा सुरक्षा मंच तर्फे सुभाष वेलिंगकर यांच्यासारखे तगडे उमेदवार असल्याने भाजपला पणजीतील आपला गड कायम राखण्यासाठी मोठे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.
 भाजपला ही निवडणूक गंभीरपणे घेणे भाग पडले आहे.काल सायंकाळी पणजी येथील एका हॉटेल मध्ये पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजी पोटनिवडणुक तयारीचा आढावा घेत मंत्री,आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्यांचे वाटप केले.
भाजपचे उमेदवार असलेल्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हयात असताना विरोधात असलेल्या बाबुश मोन्सेरात यांचा जेमतेम 1 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.त्यावेळी मोन्सेरात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते.यावेळी मोन्सेरात काँग्रेसचे उमेदवार आहेत.
मोन्सेरात यांच्या गटाची पणजी  मनपावर बरीच वर्षे एकहाती सत्ता आहे.त्यामुळे पणजी हा त्यांचा मुळ मतदारसंघ नसला तरी पणजी मनपा मधील सत्तेच्या माध्यमातून त्यांचा पणजीवासीयांशी खुप जवळचा संबंध रहिलेला आहे.
भाजपची पारंपरिक मते गोवा सुरक्षा मंच तर्फे निवडणूक रिंगणात उतरलेल्या सुभाष वेलिंगकर यांच्यामुळे विभागली जाणार आहेत.वेलिंगकर हे पणजीचे रहिवाशी आहेत.त्यांनी आरएसएस प्रमुख म्हणून काम करताना भाजपला विजयी करण्यात अनेक वर्षे महत्वाची भूमिका बजावलेली आहे.राजकारणातील वेलिंगकर हे चांगले जाणकार आहेत.भाजपची निवडणूक रणनीती ठरवण्यात वेलिंगकर एकेकाळी महत्वाची भूमिका बजावत होते.आता भाषा माध्यमाच्या प्रश्नावरुन भाजपशी फारकत घेत सक्रिय राजकारणात उतरलेले वेलिंगकर भाजपला राजकीय अद्दल शिकवण्याची नामी संधी सोडतील असे अजिबात वाटत नाही.
आम आदमीचे उमेदवार असलेल्या वाल्मिकी नाईक यांचा पणजी मतदारसंघातील जनाधार दखलपात्र असाच आहे.त्यांना गेल्यावेळी एवढी मते जरी मिळाली तरी भाजपसाठी ती धोक्याची घंटा ठरु शकणार आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी 25 वर्षे सांभाळलेला पणजी मतदारसंघ त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा उत्पल याला मिळावा, अशी धारणा असलेले भाजप कार्यकर्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज झाले आहेत.कुंकळ्येकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या भाजप कार्यकर्त्यांची संख्या बऱ्यापैकी असून भाजपला त्यावर देखील तोडगा काढावा लागणार आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मतदारसंघ असल्याने भाजपला सगळी ताकद पणाला लावून हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखावा लागणार आहे.तसे झाले नाही तर भाजपची राष्ट्रीय पातळीवर नाचक्की होणार आहे.
पर्रिकर यांच्या नंतर सभापती असलेल्या प्रमोद सावंत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या 3 पोटनिवडणुका पार पडल्या आहेत.चौथी पोटनिवडणुक पणजीत 19 रोजी होत आहे.त्यात सावंत कमी पडले तर त्यांच्या नेतृत्वा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची संधी त्यांच्याच पक्षातील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्यांना आयतीच मिळणार आहे.विश्वजीत राणे आणि प्रभारी सभापती मायकल लोबो आज देखील मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत.
एकूणच सगळ्या राजकीय परिस्थितीचा आढावा कालच्या बैठकीत घेण्यात आला.  बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी बैठकी नंतर दिलेल्या माहिती नुसार प्रत्येक आमदार मंत्र्याकडे 3 बूथची जबाबदारी देण्यात आली आहे.जबाबदारी असलेले नेते निवडणूक होई पर्यंत पणजीत तळ ठोकुन राहणार आहेत.
भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर निश्चितपणे विजयी होतील,असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला आहे.कुंकळ्येकर यांनी आपण 10 हजार मतानी विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला असला तरी मतदार नेमका काय कौल देतात यावरच सगळ काही अवलंबून राहणार आहे.
बैठकीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री माविन गुदींन्हो,दीपक पाऊसकर,मिलिंद नाईक,नीलेश काब्राल,पणजीचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, दयानंद मांद्रेकर,राजेंद्र आर्लेकर, किरण कांदोळकर, गणेश गावकर, रमेश तवडकर,सदानंद तानावड़े,संघटनमंत्री सतीश धोंड,आमदार ग्लेन टिकलो,एलिना सालढाणा आदि नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.