पणजी पोटनिवडणुकीची भाजपची उमेदवारी उत्पल पर्रिकर यांना?

0
867
गोवा खबर:पणजीच्या पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल यांनी पणजीची पोटनिवडणुक लढावी,अशी बऱ्याच कार्यकर्त्यांची इच्छा आहे.आपण वडीलांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेलो नाही.योग्य वेळ येताच कार्यकर्त्यांच्या मागणी बाबत विचार करेन,असे उत्पल यांनी जाहीर केलेले आहे.
पर्रिकर केंद्रातून राज्याच्या राजकारणात परतल्या नंतर त्यांच्यासाठि आमदारकीचा राजीनामा देऊन पणजीची जागा खाली केलेल्या माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे देखील पणजी पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठि दावेदार आहेत.कुंकळ्येकर यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेश केलेल्या सुभाष शिरोडकर यांच्यासाठि आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देखील सोडलेले आहे.त्यामुळे पणजीच्या उमेदवारीसाठि या दोन नावांचा विचार भाजप नेत्यांना करावा लागणार आहे.
दरम्यान गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सांताक्रुझचे माजी आमदार बाबूश मोन्सेरात देखील अपक्ष म्हणून पणजी मधून निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत.काँग्रेसतर्फे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो आणि पणजी काँग्रेस गटाध्यक्ष प्रसाद आमोणकर यांची नावे चर्चेत आहेत.माजी महापौर यतिन पारेख हे देखील काँग्रेसतर्फे पणजी मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.मात्र भाजपकडून कोण निवडणूक रिंगणात उतरणार यावर त्यांचा पुढील निर्णय ठरेल असे सांगितले जात आहे.