पणजी आयकर विभागात करदात्यांसाठी मदत केंद्र सुरु

0
1117

विविध उपक्रमांनी आयकर दिवस साजरा

गोवा खबर:169 व्या आयकर दिनानिमित्त पणजी आयकर विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. आज पाटो येथील कार्यालयात करदात्यांसाठी हेल्प डेस्कचे उदघाटन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच ऑनलाईन आयकर भरण्यास ज्यांना अडचण आहे, अशा व्यक्तींसाठी हा डेस्क कार्य करेल असे याप्रसंगी प्रधान कर आयुक्त श्रीमती आम्रपाली दास म्हणाल्या. हा डेस्क 24 ते 30 जुलै दरम्यान तीन ते पाच यावेळेत कार्यरत असेल.

आयकर दिनाचा मुख्य कार्यक्रम गोवा मनोरंजन संस्थेच्या सभागृहात पार पडला. यासाठी गोवा विद्यापीठाचे कुलगूर प्रो. वरुण साहनी, प्रसिद्ध छायाचित्रकार आणि लेखक विवेक मिनेझिस यांची कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती. आयकर विभागाने तंत्रज्ञानाला मानवी चेहरा देऊन सार्वजनिक क्षेत्रातील खर्चाबाबत आणखी पारदर्शकता आणावी, असे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना कुलगूरु वरुण साहनी यांनी केले. ते म्हणाले, देशाचा विकास ही व्यापक प्रक्रिया आहे. यात सर्व घटकांचे समान योगदान असले पाहिजे. शहरी-ग्रामीण ही दरी संपुष्टात आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. तर, आपले मनोगत व्यक्त करताना विवेक मिनेझिस यांनी कलाक्षेत्रातील जागतिक बाजारपेठेचा आढावा घेतला.

आयकर विभागाची प्रक्रिया आणखी सुलभ व लोकाभिमुख कशी करता येईल यावर एस. एस. धेंपे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नेटके सादरीकरण केले. आयकर विभागाने विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांचा याप्रसंगी सत्कार केला. फेबर कॅसल या शैक्षणिक साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून चेतना चॅरिटेबल ट्रस्ट, मँगो ट्री ट्रस्ट यांचा गौरव करण्यात आला.

टीडीएस फाईलींगसाठी पुंडलिक निवास येथील कार्यालयात 24 ते 26 जुलै दरम्यान सकाळी 11 ते 1 आणि दुसऱ्या सत्रात3.30 ते पाच यावेळेत करदाता ई-सहयोग अभियानांतर्गत मदतकेंद्र सुरु केला आहे.