पणजीमध्ये पहिल्यावहिल्या क्लायम्बिंग वॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद:; क्रीडासंचालक प्रभुदेसाई यांच्या हस्ते उद्घाटन

0
856

गोवाखबर:राज्यातील क्रीडाप्रेमींसाठी राजधानी पणजीमध्ये एका नव्या क्रीडाप्रकाराचे आगमन झाले आहे. साहसी खेळ म्हणून ओळख असलेल्या रॉक क्लायम्बिंगचा आनंद घेण्यासाठी ‘द आय’ या संकल्पनेत एक ‘वॉल’ उभी करण्यात आली आहे. कंपाल येथील युथ हॉस्टेलच्या आवारात मांडवी नदी काठी ही कृत्रिम भिंत उभी करण्यात आली आहे.

राज्याच्या क्रीडा खात्याचे संचालक व्हि. एम. प्रभुदेसाई यांच्या हस्ते या भिंतीचे औपचारिक उद्घाटन आज करण्यात आले. युथ हॉस्टेलचे प्रमुख अनंत जोशी देखील यावेळी उपस्थित होते.

 

उद्घाटनप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना क्रीडा खात्याचे संचालक व्हि. एम. प्रभुदेसाई यांनी हा उपक्रम सुरु केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन व कौतुक केले. पहिल्याच दिवशी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम क्रीडाप्रेमींमध्ये उत्तरोत्तर लोकप्रिय ठरेल याबद्दल शंका वाटत नाही, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. लहान मुलामुलींपासून प्रौढांपर्यंत उपस्थित क्लायम्बिंग प्रेमी पाहून हा क्रीडाप्रकार गोव्यामध्ये सुरु झाला आहे, याबाबत आनंद वाटतो, असे म्हणून त्यांनी आयोजक, प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.

 

अॅडव्हेन्चर ब्रेक्स, मॅगसन्स, क्रीडा संचलनालय व युथ हॉस्टेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

 

अॅडव्हेन्चर ब्रेक्सचे संचालक किम सबीर यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले कि, सुरुवातीला सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ५ ते ७ यावेळात अतिशय माफक शुल्क आकारून हा उपक्रम राबविला जाईल. त्यानंतर मागणीनुसार वेळेत बदल करण्यात येईल. राज्यतील स्थानिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन किम यांनी केले.

 

या खेळाचे प्रशिक्षक पंचम केळकर हे मुळचे पुण्याचे असून वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांची या साहसी खेळाशी ओळख झाली, असे त्यांनी सांगितले. ही कृत्रिम भिंत २० फुट उंच असून गोव्यातील तरुणांना ऑलम्पिक स्पर्धेच्या शिस्तीत प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न राहील, असे पंचम केळकर यांनी सांगितले. तसेच या खेळाचा आनंद पाच वर्षाच्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही घेऊ शकतो. सर्वांना या खेळाची ओळख करून द्यायला आम्ही उत्सुक आहोत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.