पणजीमध्ये टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

0
972

 

भारत टपाल कार्यालय, गोवा क्षेत्र आयोजित ‘गोवापेक्स २०१९’ या टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाचे आज उद्घाटन करण्यात आले. गोव्याचे अतिरिक्त मुख्य वन संरक्षक व मुख्य वन्यजीव वार्डन संतोष कुमार तसेच गोवा विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक नंदकुमार कामत यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी प्रस्तावना करताना पोस्ट मास्टर जनरल, गोवा क्षेत्र डॉ. एन विनोद कुमार यांनी गोव्यातील संग्राहकांच्या आत्मविश्वासामुळे या प्रदर्शनाचे आयोजन टपाल विभाग करू शकला, असे सांगितले. या प्रदर्शनामध्ये एकूण २०३ फ्रेमचा समावेश आहे, जी की खूप मोठी संख्या आहे; साधारणपणे एका प्रदर्शनामध्ये ५० ते १०० फ्रेमचा समावेश असतो. सदर प्रदर्शनात ११ शाळांनी आपला संग्रह मांडला आहे, अशी माहिती विनोद कुमार यांनी यावेळी दिली. ‘गोवापेक्स २०१९’मध्ये विशेष स्थान देण्यात आलेल्या समुद्री ऑलिव्ह रेडली कासवाबद्दल बोलताना ते म्हणाले की. प्राण्यांना आपल्या जीवनात योग्य स्थान व महत्व देण्याची गरज आहे. पृथ्वी ग्रह सर्वांसाठी आहे, यातील इतर जीवांचे अस्तित्व नाकारून चालणार नाही. याबरोबरच प्रयत्नपूर्वक त्यांचे जतन करणे, ही देखील आपली जबाबदारी आहे. जगाचे भविष्य असलेली तरुण पिढी हा संदेश समजेल व याचा गांभीर्याने विचार करून जबाबदारी घेईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ऑलिव्ह रेडली कासवावरील एका पृष्ठाचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. येत्या दोन दिवसात गोव्यातील किल्ले व घुमट वाद्यावर देखील अशाप्रकारचे पुष्ठ प्रकाशित करण्यात येणार आहे.

 

समारंभाचे अतिथी, प्राध्यापक नंदकुमार कामत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, टपाल तिकिटे केवळ टपाल विभागाचे अंग नसून तो ज्ञानार्जनाचा स्रोत आहे. भविष्यात हे महत्वाचे साधन कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्सच्या काळात छापले जाणार नाही; भविष्यात याला वारसा म्हणून खूप महत्व असेल, त्यामुळे गांभीर्याने हा संग्रह समजून घ्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. ऑलिव्ह रेडली कासवांना गोवा वन विभागाने संरक्षण देऊन जगासमोर आदर्श ठेवल्याबद्दल कामत यांनी गोवा वन विभागाचे कौतुक केले. तसेच जगातील सर्वश्रेष्ठ टपाल सेवा भारताची असल्याबद्दलही अभिमान व्यक्त केला. टपाल तिकिटे म्हणजे संस्कृती व नागरिकीकरणाचे द्योतक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

 

कार्यक्रमात गोव्याचे अतिरिक्त मुख्य वन संरक्षक व मुख्य वन्यजीवन वार्डन संतोष कुमार यांनी विशेष स्थान म्हणून कासावांवरील पृष्ठाचे प्रकाशन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याद्वारे नागरिकांचा सहभाग वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. वन्य जीवांच्या संरक्षणामध्ये स्थानिकांचा सहभाग अत्यंत आवश्यक असतो, त्यासाठी त्यांची मदत आम्ही घेतो, असे यावेळी ते म्हणाले. कासव जिथे जन्म घेतो त्याच ठिकाणी अंडी घालण्यास येतो, अशी माहिती देताना ते म्हणाले, गोव्यातील पर्यटक ऑलिव्ह रेडली कासव पाहायला आले, तर स्थानिकांना नवीन संधी देखील मिळतील. मानवाला प्राण्यांसोबत राहण्यास शिकावे लागेल; त्यांच्या क्षेत्रात प्रवेश थांबवा, ते तुम्हाला त्रासदायक ठरणार नाहीत, असेही संतोष कुमार याप्रसंगी म्हणाले.

या प्रदर्शनामध्ये सहभागी स्पर्धकांच्या संग्रहाचे परीक्षण पुरुषोत्तम भार्गवे, नाशिक व प्रतिसाद नेऊरगांवकर, पुणे हे टपाल तिकीट संग्राहक करणार आहेत.

 

यावेळी उपस्थितांचे स्वागत वरिष्ठ टपाल अधीक्षक अर्चना गोपीनाथ यांनी केले, तसेच आभारप्रदर्शन सहायक अधीक्षक दीपक भोवर यांनी केले.

 

९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ मेनेझेस ब्रागांझा सभागृहामध्ये हे प्रदर्शन सकाळी १० ते संध्याकाळी ७ यावेळात नागरिकांना बघता येईल.