पणजीत रंगू लागले प्रचार युद्ध

0
1156

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर लढवत असलेल्या पोटनिवडणुकीमुळे पणजी मतदारसंघात आता प्रचार युद्ध रंगू लागले आहे.आज रविवारची सुट्टी असल्याचा फायदा घेत काँग्रेस आणि भाजपने घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला.
सकाळी काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात मीरामार बीच वरुन केली. मीरामार किनाऱ्यावर कॅसिनो बोट रुतुन बसली आहे.भाजप सरकारमुळे पणजीचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक वातावरण कलुषित होत असून त्याला पर्रिकर जबाबदार असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे.कॅसिनोच्या विषयावर पणजीवासियांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी काँग्रेसच्या महिला विभागाने ज्या मांडवी नदित कॅसिनो आहेत त्या मांडवी नदीची पूजा करून मांडवी नदी लवकर कॅसिनोच्या संकटापासून मुक्त व्हावी अशी प्रार्थना केली.
सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पणजी शहरामधील टोंका करंजाळे भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. आपला 25टक्के प्रचार पूर्ण झाला असून पणजीच्या लोकांचा आपल्यावर विश्वास असल्याने आपला मोठा मताधिकक्याने विजय निश्चित आहे असा दावा पर्रिकर यांनी केला आहे.
गोवा सुरक्षा मंचच्या उमेदवाराच्या प्रचारात आरएसएसचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर पर्रिकर यांच्या विरोधात प्रचाराची धुरा सांभाळणार असल्याने ऐन गणेशोत्सवाच्या दिवसात गोव्यात प्रचाराचा शिमगा रंगलेला पहायला मिळणार आहे.