पणजीत बॉम्बे बझारच्या तिसऱ्या मजल्याला आग

0
1059
गोवा खबर:पणजी शहरातील अठरा जून मार्गावरील बॉम्बे बाजार इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लगलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाने पणजीसह म्हापसा, ओल्ड गोवा केंद्रांतील बंबचाही वापर केला. अग्निशामक दलाचे संचालक जवान रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.
काल  रात्री साडेनऊच्या सुमारास पणजीतील बॉम्बे बाजारच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे समजताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले . वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकसानीचा आकडा एक कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले तेव्हा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आगीने मोठय़ा प्रमाणात पेट घेतला होता. ज्या ठिकाणी आग लागली होती ती जागा अडगळीची होती, त्यामुळे अग्निशामक दलाचे बंब त्या ठिकाणी नेणे कठीण होते. त्यामुळे अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यास उशीर झाला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बॉम्बे बाजाराच्या तिसऱ्या मजल्यावर केवळ पत्रे लावून बेकायदेशीररित्या गोदामासाठी जागा तयार करण्यात आली होती. गोदामाच्या आजूबाजूला अनेक कार्यालये असून त्यात काही वकिलांच्या कार्यालयांचाही समावेश आहे. आग वेळीच आटोक्यात आली नसती तर काही कार्यालयेही जळून खाक होण्याचीही शक्यता होती.