पणजीत कार्निव्हलच्या मार्गाला पोलिसांचा रेड सिग्नल

0
716
 गोवा खबर:पणजीचे सत्ताधारी भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या आग्रहाखातर पणजी महानगरपालिकेने यंदा जुन्या मार्गावरुन कार्निव्हल मिरवणुक निघेल असे जाहीर केले असले तरी पोलिसांनी या मार्गाला वाहतूक कोंडीचे कारण देत रेड सिग्नल दाखवला आहे.मनपाने मात्र कार्निव्हल मिरवणुक काहीही झाले तरी त्याच मार्गावरुन निघेल असा पवित्रा घेत पोलिसांना आव्हान दिले आहे.
अटल सेतूचे काम सुरु असताना चित्ररथ वाहतूक करण्यास अडथळा येत असल्याने पणजी येथील कार्निव्हल मिरवणूक मीरामार ते दोनापावल मार्गावर हलवण्यात आली होती.यंदा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या आग्रहाची दखल घेऊन पणजी मनपाने जुने सचिवालय ते कला अकादमी दरम्यान कार्निव्हल मिरवणूक निघणार असल्याचे जाहीर केले होते.मात्र पणजी मनपाने लेखी मागणी करताच पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत कार्निव्हल मिरवणूकीला परवानगी नाकारल्याने पणजी मनपा अडचणीत आली आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे समजताच पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करत आम्ही जाहीर केलेल्या मार्गालाच परवानगी मिळाली पाहिजे,अशी भूमिका घेतली.
आमदार मोन्सेरात आणि महापौर मडकईकर यांची मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे.या बैठकीस सर्व संबंधित हजर राहणार असून त्यात जुने सचिवालय ते कला अकादमी या मार्गावरुन कार्निव्हल मिरवणूकीला परवानगी द्यायची की नाही हे ठरणार आहे.
दरम्यान काहीही झाले तरी याच मार्गावरुन कार्निव्हल मिरवणुक निघेल,असे महापौर मडकईकर यांनी स्पष्ट केले आहे.
पणजीत कार्निव्हलची जय्यत तयारी सुरु
22रोजी पणजीत कार्निव्हल मिरवणुक होणार असून त्याची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.शहरात सजावटीची कामे सुरु असून सांबा चौकात चार दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.यंदा खास पर्यटकांना निवांत बसून कार्निव्हलचा आनंद लूटता यावा यासाठी विशेष बैठक व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी पाचशे खुर्च्या प्रत्येकी 500 रुपये दराने उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्याला चांगला प्रतिसाद लाभेल,अशी अपेक्षा आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केली आहे.