पणजीतील सुज्ञ मतदार भाजप सोबत:तेंडुलकर

0
741
गोवा खबर: पणजीतील मतदार हे सुज्ञ आणि सुशिक्षित आहे त्यामुळे काय चांगले व काय वाईट हे त्यांना कळते. पणजीतील मतदारांवर आमचा पूर्ण विश्वास असून आमचा विजय निश्चित असल्याचा दावा, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी  केला.
यावेळी  माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, राज्य सरचिटणीस गोविंद पर्वतकर  उपस्थित होते.
 तेंडुलकर म्हणाले , गोवा सुरक्षा मंच हा प्रादेशिक पक्ष आहे. यापूर्वी त्यानी दोनदा निवडणूक लढवली असून पहिल्यांदा दीड टक्के तर दुसऱ्यांदा केवळ सव्वाटक्केच मते त्यांना मिळाली होती.
 बाबुश मोन्सेरात संशयित असलेल्या कथित बलात्कार प्रकरणाला  बळी पडलेली पिडीत युवती कुठे बेपत्ता झाली याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी  तेंडुलकर यांनी केली. ही मुलगी बेपत्ता आहे की तीला पळवण्यात आले? काय खरे ते लवकरात लवकर पोलिसांनी शोधून काढावे. उपलब्ध माहितीनुसार ही मुलगी बसमधून उतरली त्यावेळी बसला देण्यासाठीही तीच्याकडे पैसे नव्हते मग ही मुलगी कुठे गेली असा प्रश्न शेवटी उरतोच!,याकडे तेंडुलकर यांनी लक्ष वेधले.
 तेंडुलकर म्हणाले, काँग्रेस नेते रमाकांत खलप यांनी पणजीतील जनतेला काँग्रेस उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले.  मला खलप यांची किव करावीशी वाटते. याच काँग्रेस उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी आयटी प्रकल्पावेळी खलप यांच्या मुलाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले होते.
 गोसुमंच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रा. सुभाष वेलिंगकर हे भाजप सत्तेत येण्यामागचे कारण असल्याचे विधान केले होते त्यावर बोलताना आर्लेकर म्हणाले, वेलिंगकर यांना एकटयाला नव्हे तर त्यांच्या सोबत झटलेल्या इतर कार्यकर्त्यांना देखील भाजपला सत्तेवर आणण्याचे श्रेय जाते. भाजपला मिळालेले हे यश कुणा एकटयाचे नाही.
कॅसिनो संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना  तेंडुलकर म्हणाले, जेवढे कॅसिनो मांडवीत आहे त्या सर्वांना काँग्रेसने परवानगी दिली आहे. आम्हाला त्यांच्या परवान्यांचे  नूतनीकरण करावे लागले. मांडवीतील कॅसिनो इतर ठिकाणी हलविण्याचा विचार चालू आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कानावर देखील हा विषय घालण्यात आला आहे.लोकांना जर पाण्यातील आणि जमीनीवरील कॅसिनो नको असतील तर त्याची दखल घेऊन योग्य ती पावले उचलली जातील,असेही तेंडुलकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्रीय नेते नितीन गडकरींची 16 रोजी जाहीर सभा
केंद्रीय नेते नितीन गडकरी यांची  16 रोजी पणजीत जाहीर सभा होणार आहे. पणजी झरी जवळ ही सभा होण्याची शक्यता तेंडुलकर यांनी वर्तवली.