पणजीतील कॅसिनो आग्वाद मध्ये हलवल्यास तीव्र विरोध: फर्नांडिस

0
752
 गोवा खबर:पणजीवासीयांना मांडवीत नको झालेले कॅसिनो आग्वाद हलवण्याचे ठरल्यास आम्ही त्याला तीव्र विरोध करु,असा इशारा कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडीस यांनी आज दिला.
आग्वाद मध्ये कॅसिनो आला तर ड्रग्स  तसेच वेश्या व्यवसाय वाढेल अशी भीती व्यक्त करून फर्नांडीस म्हणाले,आग्वाद समुद्रात पर्यटकांसाठी बोट ट्रिप करणाऱ्या तसेच तेथील मच्छीमारांना देखील अडथळा होणार आहे. आमच्या भागात कॅसिनो येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही थराला जाऊ,असा  इशारा देखील फर्नांडिस यांनी दिला आहे.

फर्नांडिस यांनी मंत्री मायकल लोबो यांच्या दुटप्पी धोरणावर देखील टिका केली.लोबो अगदी खालच्या थराला जाऊन करत असलेले कॅसिनोंचे समर्थन चुकीचे असल्याचे फर्नांडिस म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मांडवी मधील कॅसिनोंना सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.कॅप्टन ऑफ पोर्टचे मंत्री असलेले मायकल लोबो पणजीवासीयांच्या विरोधाची दखल घेऊन मांडवी मधील कॅसिनो अन्यत्र हलवण्यासाठी जागेचा शोध घेत आहेत.एका कॅसिनोने आग्वाद मध्ये आपले जहाज हलवण्यास तयार असल्याची माहिती लोबो यांनी दिली होती.या पार्श्वभूमीवर कळंगुट काँग्रेसने विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.