पक्षांतराला कायमचा पुर्णविराम देण्यासाठी क्रांतीकारी पाऊले उचलण्याची वेळ आली आहे : दिगंबर कामत 

0
175
गोवा खबर : आपणांस निवडून देणाऱ्यांप्रती जबाबदारीने वागणे व प्रामाणिक राहणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. आजच्या बदलत्या राजकीय वातावरणात पक्षांतराला कायमचा पुर्णविराम देण्याची वेळ आली आहे. गोवा विधानसभेच्या अधिवेशनात पक्षांतर बंदी कायदा अधिक प्रभावशाली करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्याचा ठराव मी मांडणार असुन, राजकारणात सकारात्मक बदल आणण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे पाऊल आहे असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
गोव्याचे माजी मंत्री, विरोधी पक्ष नेते तसेच भारतीय घटनेचे जाणकार डॉ. काशिनाथ जल्मी यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण करताना, विरोधी पक्ष नेत्यांनी सन १९९० मध्ये सभापती हे पक्षांतरात सामील होवू शकत नाहीत हा ऐतिहासिक निवाडा डॉ. काशिनाथ जल्मी यांनी  दिला होता त्याला उजाळा दिला. सदर निवाडा सर्वोच्च न्यायालयानेही नंतर ग्राह्य ठरविला होता याची आठवण दिगंबर कामत यांनी करुन दिली.
डॉ. काशिनाथ जल्मीनी पक्षांतरावर ऐतिहासिक निवाडा देवून पक्षांतराला पुर्णविराम देण्यासाठी पाऊले उचलली होती. आज त्यांचे ध्येय पुर्णत्वास नेण्याची वेळ आली आहे. आज सर्व लोक प्रतिनिधीनीं पक्षांतरा विरूद्ध कडक कायदा करण्यासाठी एकमताने पूढे येणे गरजेचे आहे. गोवा विधानसभेतील सर्व चाळीस आमदारांनी एकमताने माझ्या ठरावाला पाठींबा देवून सदर ठरावामार्फत केंद्र सरकारकडे पक्षांतर विरोधी कायद्यात आवश्यक बदल करुन तो अधिक प्रभावी करण्यासाठी मागणी करावी असे आवाहन दिगंबर कामत यांनी केले आहे.
डॉ. काशिनाथ जल्मींची पुण्यतीथी २२ जुलै रोजी असुन, कॉंग्रेस पक्ष येत्या दहा दिवसांत जनसंपर्काद्वारे लोकांमध्ये  पक्षांतराचा लोकशाहीवर होणाऱ्या वाईट परिणामांवर जागृती करणार आहे. लोकांनी जनमताविरूद्ध जाणाऱ्या आपल्या प्रतिनिधींना जाब विचारणे गरजेचे असल्याचे महत्व आम्ही लोकांना पटवुन देणार आहोत.
प्रत्येक लोक प्रतिनिधाने जनमताचा आदर केला पाहिजे. एकदा निवडून आलेल्या लोक प्रतिनिधीला लोकांचा वा पक्षाचा विश्वासघात करण्याचा अधिकार नाही. लोकांनी दिलेल्या कौलानुसारच आपला कार्यकाळ पुर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे. जर एखाद्या पक्षाचे विचार व धोरणे बदलल्यास वा आपले विचार पटत नसल्यास सदर लोक प्रतिनिधीने राजीनामा देवून परत लोकांचा विश्वास संपादन करावा असे मत दिगंबर कामत यांनी व्यक्त केले आहे.
कॉंग्रेस पक्षाने गोव्यातील दहा फुटीर आमदारांविरूद्ध विधानसभा सभापती तसेच सर्वोच्च न्यायालयात अपात्रता याचिका दाखल केली असुन, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठासमोर सदर याचीका प्रलंबित आहे. कॉंग्रेस पक्ष सोडुन भाजपकडे हातमिळवणी केलेल्या दहा आमदारांनी आपल्या मतदारांचाही विश्वासघात केला आहे. सदर मतदारसंघातील लोकांना न्याय मिळवून देण्यास कॉंग्रेसपक्ष वचनबद्द आहे. आमचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सदर फुटीर आमदारांना कॉंग्रेसची दारे कायमची बंद केल्याचे यापुर्वीच स्पष्ट केल्याचे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.