पंतप्रधान मोदी यांनी आधुनिक  भारताचा पाया रचला:कोप्पीकर

0
1247
गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेत नवीन भारताचा पाया रचला आहे. गोव्यातील जनतेने मोदींना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे सर्व उमेदवार निवडणून द्यावेत, असे आवाहन बॉलीवुड अभिनेत्री इशा कोप्पीकर हिने चिंबल येथील भाजपच्या प्रचारसभेत बोलताना केले.
लोकसभा निवडणुकीचे भाजपचे उमेदवार आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत कोप्पीकर यांनी हजेरी लावत भाजपची पाठराखण केली.
मोदींनी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. अनेक विकास योजनांची पायाभरणी केली. देशभरात अनेक विकासकामे सुरू केली आहेत. स्वच्छ, पारदर्शक प्रशासनाबरोबरच भष्ट्राचार रोखण्यासाठी प्रयत्न केले. पुढील पाच वर्षात याचे अनुकुल परिणाम दिसून येणार आहेत, असेही  कोप्पीकर म्हणाली.
 यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दामू नाईक, हेमंत गोलतकर, प्रमोद कामत, गिरीश उसकईकर, अनिल होबळे, मेधा परुळेकर, संदेश गडकर, निलेश कामत व इतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन तुळशीदास मडकईकर यांनी केले.
मागच्या पाच वर्षांप्रमाणेच जर भारताचा विकास व्हायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यांचे नेतृत्वच देशाला वेगवान विकासाचा मार्ग दाखवू शकते, असे प्रतिपादन कोप्पीकर यांनी कुठ्ठाळी मतदारसंघातील झुआरीनगर भागात आयोजित भाजपाच्या प्रचारसभेत केले.
   झुआरीनगरातील नाक्यावर रविवारी संध्याकाळी ही सभा पार पडली.यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मंत्री मिलिंद नाईक, मंत्री माविन गुदिन्हो, राज्यसभा खासदार व प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे उमेदवार खासदार नरेंद्र सावईकर, आमदार एलिना साल्ढाना, पक्षाचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, अखिल गोवा मुस्लीम कल्याण संघटनेचे अध्यक्ष अश्रफ पंडियाल, स्थानिक पंच नारायण नाईक, सतीश पडवळकर, कविता कमल तसेच ऍड. विद्या शेट तानावडे, पल्लवी शिरोडकर, अनिता रायकर, अच्च्यूत नाईक, रंगाप्पा कमल उपस्थित होते.
    कोप्पीकर यांनी  आपल्या भाषणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केले. एक साधे सरळ आणि तितकेच कार्यक्षम नेते म्हणून ते देशात लोकप्रिय ठरले. त्यांचे कार्यही फार मोठे होते. देश पर्रीकरांचे कार्य विसरणार नाही, असे त्या म्हणाल्या.
 गोव्याची देवी शांतादुर्गा हे आपले कुलदैवत असून गोव्याशी आपले फार जुने नाते आहे. त्यामुळे गोव्यात आपले येणे जाणे असते अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
 उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जोष आणलेला आहे. पुन्हा नरेंद्र मोदी यांचीच लाट देशभर आहे. या लाटेत स्वार होण्यास गोवेकर कमी पडता कामा नये, असे स्पष्ट करून पंतप्रधानांनी आणलेला जोश आम्हाला कायम ठेवावा लागेल. मोदी सरकारने देशात आणि गोव्यात विकास साधलेला आहे. काँग्रेसने देशावर अनेक वर्षे राज्य केले. मात्र, गोव्यात आजच्या सारखा विकास झाला नव्हता. मोदींच्या काळातच मोठी कामे गोव्यात झाली त्याची पोचपावती सगळ्यांनी दिली पाहिजे.
 माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची आठवण काढताना त्यांनीच आपल्यासारख्या दलिताला प्रथम मंत्री बनवले. त्यानंतर या पक्षाने दलिताला उपमुख्यमंत्रीसुध्दा बनवले. भाजपाच असे कार्य करू शकते, असे आजगावर यावेळी म्हणाले.
   खासदार नरेंद्र सावईकर म्हणाले, देशात प्रथमच विरोधी राजकीय पक्षांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. ही भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेली आहे. या पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या यशाचा धसका घेतला आहे. पंतप्रधानांनी देशाची सूत्रे हाती घेताच प्रथम गरीब व वंचितांचा विचार केला. गावागावात शौचालये, स्वच्छता, स्वयंपाक गॅस व वीज जोडणी असे विविध उपक्रम त्यांनी गरिबांसाठी राबवले. सहा कोटी कुटुंबांना स्वयंपाक गॅस त्यांच्या योजनेतून उपलब्ध झाला. हे सर्व काँग्रेसच्या काळात झालेच नाही कारण त्यांनी सामान्यांचा विचार कधी केलाच नाही. नरेंद्र मोदी हे सामान्य परीस्थितीतूनच वर आलेले नेते आहेत. त्यामुळेच त्यांनी सर्वात प्रथम सामान्यांच्या गरजांचा विचार केला. सामान्य जनतेला आणि देशाला विकासाच्या यशोशिखरावर नेण्यासाठी पुन्हा मोदीच हवे आहेत. हे जनतेलाही पटलेले आहे, असे खासदार सावईकर यावेळी म्हणाले.
   जेव्हा मुंबईत दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी इच्छा जनतेमध्ये निर्माण झाली होती. परंतु त्यावेळी काँग्रेस सरकारला ते धैर्य झाले नाही. नरेंद्र मोदांनी ते करून दाखवले. आता भारताकडे कुणी वाकडया नजरेने पाहण्याचे धाडस करणार नाही. नरेंद्र मोदींचे नाव जागतिक स्तरावर पसरलेले आहे. त्यांच्या नेतृत्व गुणांवर प्रभावीत होऊनच आपण भाजपात प्रवेश केल्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले.
  या सभेत मंत्री मिलिंद नाईक, आमदार एलिना साल्ढाना, अश्रफ पंडियाल, नारायण नाईक यांचीही भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन गौरीश बोरकर यांनी केले तर सानिया परेरा यांनी आभार मानले.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा मुरगाव मतदारसंघातील हेडलॅण्ड सडा भागातही भाजपाच्या प्रचारार्थ अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांची सभा पार पडली.