पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ द्वारे नागरिकांशी साधला संवाद

0
788

 

 

गोवा खबर:हिंसाचार हा कुठल्याही समस्येचा तोडगा असू शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी नवीन वर्षातील पहिल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे प्रजासत्ताक दिनी भारतीय नागरिकांशी संवाद साधतांना सांगितले.


आसाममध्ये वेगवेगळ्या आठ दहशतवादी गटातल्या 644 लोकांनी आपल्याकडच्या हत्यारांसहित आत्मसमर्पण केल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, या सर्व लोकांना शांतीचा मार्ग विश्वासदायी वाटत असून या लोकांनी देशाच्या विकास कार्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्रिपुरामध्ये मागील वर्षी 80 पेक्षा जास्त लोक हिंसेचा मार्ग सोडून मुख्यधारेत आले आहेत.

गेल्या 25 वर्षापासून रखडत आलेला  ब्रू-रियांग रेफ्यूजी क्रायसेस करार संपुष्टात आला असून यामुळे एक प्रकारचे वेदनादायी, क्लेशकारक प्रकरणाचा अंत झाला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

ब्रू-रियांग जनजातीच्या लोकांना मिझोराममधून बाहेर पडून त्रिपुरामध्ये शरणार्थी बनावं लागलं होतं. 23 वर्षाच्या दीर्घ कालावधीला या जमातीला आरोग्य, निवारा, शिक्षणपासून वंचित राहावं लागले होते. हा करार संपुष्टात आल्याने या शरणार्थींना आता सर्व सुविधा प्राप्त होणार आहेत. केंद्र सरकारने 600 कोटींची मदत जाहीर केली असून प्रत्येक विस्थापित कुटुंबाला भूखंड देण्यात येणार आहे.

यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी मागील वर्षात नागरिकांना केलेल्या आव्हानांचा आढावा घेऊन वर्षभरात केलेले संकल्प पुनर्स्मरणात आणले. बिहारचे शैलेश यांनी पाठवलेल्या पत्रात या सर्व बाबींचा उल्लेख असून शैलेश यांनी आधीच्या आणि नवीन संकल्पनांचे चार्टर बनवून एक सूची तयार केली आहे.  हा एक ‘न्यू इयर रिझोल्यूशन’चा भाग असून याला ‘सोशल रिझोल्यूशन’ची म्हणजेच  सामाजिक संकल्पाची जोड देण्यात आली आहे. शैलेश यांनी गरिबांना हिवाळी हंगामात पुरवलेल्या गरम कपड्यांच्या संकल्पांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि शैलेश यांना त्यांच्या चार्टरवर स्वत:ची स्वाक्षरी करून परत पाठवण्याचे आश्वासनही दिले.

पंतप्रधानांनी मागील वर्षात, ‘संदेश- टू सोल्जर्स’ ‘खादी फॉर नेशन- खादी फॉर फॅशन’ ‘स्थानिक उत्पादन खरेदी करण्याचा मंत्र तसंच ‘आपण फिट तर भारत फिट’ ‘माय क्लिन इंडिया’ तसंच ‘स्टॅच्यू क्लिनिंग’ यामधून सर्व पुतळे-प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी जनतेची चळवळ सुरू केली. हॅश-टॅग नो टू ड्रग्स, हॅश-टॅग भारत की लक्ष्मी, हॅश-टॅग सेल्फ फॉर सोसायटी, हॅश-टॅग सुरक्षा बंधन, हॅश-टॅग डिजिटल इकॉनॉमी, हॅश-टॅश रोड सेफ्टी या सर्व संकल्पांची अंमलबजावणी देशाच्या विविध कानाकोपऱ्यात झाली असून ही एक प्रकारची ‘मन की बात’ या कार्यक्रमाची यशोगाथा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

‘पार्टिसिपेटिव्ह स्पिरीट’ बद्दल बोलतांना पंतप्रधानांनी सांगितले की, आज जल संरक्षणासाठी अनेक व्यापक आणि नवनवीन संकल्पना देशभरातल्या प्रत्येक कानाकोप-यात राबवल्या जात आहेत. जन भागीदारीमुळे हे ‘जल शक्ती अभियान’ अतिशय यशस्वी होण्याच्या दिशेने पुढं जात आहे. देशात मोठ्या संख्येने तलावांची तसंच जलसाठ्यांची निर्मिती झाली असल्याने गावागावांमध्ये पाण्याची टंचाई दूर करण्यात येत आहे. यामुळे या संकल्पाला बळकटी मिळाली असून जलशक्ती चँपियन्सच्या कथा ऐकण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे.

पंतप्रधानांनी यावेळी आवाहन केले की, जल-संचय आणि जल संरक्षण याविषयी आपण जर काही प्रयोग केले असतील, किंवा आपल्या आजूबाजूला असे काही प्रयोग होत असतील, तर त्यांची माहिती, छायाचित्र किंवा व्हिडिओ ‘‘हॅश-टॅग जलशक्तीफॉरइंडिया’’ यावर जरूर शेअर करावी.

पंतप्रधानांनी आसाम सरकार  आणि जनतेचे ‘खेलो इंडिया’चे यजमानपद शानदारपणे भूषवल्याबद्दल अभिनंदन केले. यामध्ये विविध राज्यातल्या जवळपास सहा हजार क्रीडापटूंनी भाग घेतला आणि जुने 80 विक्रम मोडले. विशेष म्हणजे यामध्ये 56 विक्रम मोडण्याचे काम तर भारताच्या मुलींनी केले. ‘खेलो इंडिया’ गेम्सला भारतभरातून प्रोत्साहन मिळत असून यामध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलामुलींचा वाढता सहभाग आहे.

‘फिट इंडिया स्कूल’बाबात बोलतांना पंतप्रधानांनी सांगितले की, 65हजारांपेक्षा जास्त शाळांनी या मोहिमेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ‘फिट इंडिया स्कूल’चे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

‘गगनयान मिशन’संदर्भात बोलतांना पंतप्रधानांनी 21 व्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत ऐतिहासिक पराक्रम करून नवीन भारतासाठी एक मैलाचा दगड सिद्ध होईल, अशी आशा व्यक्त केली.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, गगनयान मिशनमध्ये चार भारतीय अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. हे चारही युवा भारतीय वायूसेनेचे वैमानिक असून बुद्धिमान, कुशल, प्रतिभावान, साहसी, धाडसी युवकांचे जणू प्रतीक आहेत. हे चारही अंतराळवीर विशेष प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

त्यांनी देशवासियांना नवीन संकल्पांची पूर्ती करताना संपूर्ण विश्वाच्या भारताकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करताना विश्वासाने, एकमेकांच्या सहकार्याने मार्गक्रमण करून नवीन दशकाचा प्रारंभ करू, असे आवाहन केले.