गोवा खबर: गोव्यातील मंत्री, आमदार, खासदारांसोबत खनिज खाण अवलंबितांच्या काही नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडे अकरा वाजता भेटणार आहेत.
Meeting Hon’ble PM shri @narendramodi ji tomorrow at 11.50 am for resumption of mining with delegation @BJP4Goa and coalition partners .
— Shripad Y. Naik (@shripadynaik) February 5, 2019
भाजपाचे तिन्ही खासदार तसेच भाजपाचे मंत्री निलेश काब्राल, गोवाफॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई, सभापती प्रमोद सावंत, मगोपचे आमदार दिपक प्रभू पाऊसकर हे पंतप्रधानां सोबत होणा-या बैठकीवेळी उपस्थित असतील. खाण अवलंबितांच्या संघटनेचे प्रमुख पुती गावकर तसेच अन्य काही अवलंबितांसोबत पंतप्रधानांची चर्चा होईल. खनिज खाणी लवकर सुरू केल्या जाव्यात अशी मागणी घेऊन खाण अवलंबितांनी गेले वर्षभर आंदोलन करत आहेत. खाण अवलंबितांचे नेते यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटले होते.
अमित शहा यांनी खनिज खाणी सुरू होण्याबाबत केंद्र सरकार तोडगा काढील व पुढील आठ दिवसांत तुम्हाला त्याची कल्पना येईल असे गेल्या महिन्यात पुती गावकर व इतरांना सांगितले होते पण काहीच तोडगा न निघाल्याने खाण अवलंबितांनी 13 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. तसेच गोव्याचे तिन्ही खासदार झोपलेले आहेत, अशीही टीका गावकर यांनी केली होती.
अमित शहा यांची 9 रोजी गोव्यात सभा होत आहे. या पाश्र्वभूमीवर मोदी यांची भेट मिळायलाच हवी म्हणून प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व इतरांनी प्रयत्न केले. भेट निश्चित झाली असून मोदी नेमका कोणता उपाय सूचवतात याकडे खाण अवलंबितांचे लक्ष लागले आहे. कायदेशीर तोडगा काढण्याची ग्वाही यापूर्वी अमित शहा यांनी दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 88 खनिज लिजेस बंद केल्यापासून खनिज खाणी बंद आहेत.
मंत्री सुदिन ढवळीकर हे हैद्राबाद येथे वैद्यकीय तपासणीसाठी गेले आहेत. त्यामुळे ते बैठकीला पोहचू शकणार नाहीत.