पंतप्रधानांनी देशभरातील मुद्रा योजना लाभार्थ्यांशी व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून साधला संवाद

0
1201

 गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून देशभरातील मुद्रा योजना लाभार्थ्यांशी संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थ्यांसोबत संवाद साधण्याच्या पंतप्रधानांच्या व्हिडिओ ब्रिज श्रृंखलेतील ही दुसरी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे.

लाभार्थ्यांशी संवाद साधतेवेळी आपला आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, मुद्रा योजना ही नोकरी देणारी बनली आहे. या उपक्रमामुळे उद्योजकांना सावकार आणि दलालांच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायला मदत होत आहे. यामुळे युवक, महिला आणि आपला नवीन व्यवसाय सुरू अथवा त्याचा विस्तार करू इच्छिणाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध आहेत.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत 12 कोटी रुपये कर्जापैकी 5.75 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. यापैकी 28 टक्के म्हणजेच 3.25 लाख कोटी रुपयांचे कर्ज हे नव उद्योजकांना दिले आहे. एकूण वितरीत कर्जापैकी 74 टक्के महिला लाभार्थी आहेत तर 55 टक्के कर्ज हे अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजातील लोकांना देण्यात आले आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना लाभार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, या योजनेमुळे गरिबांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे. छोट्या आणि लघु व्यवसायांना सहाय्य करून ही योजना लोकांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या बळकट करत आहे आणि लोकांना यशस्वी होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

स्वयं-रोजगार निर्मितीवर जोर देताना पंतप्रधान म्हणाले की, स्वयं-रोजगार निर्मिता असणे ही आता अभिमानाची बाब झाली आहे. याआधी अशक्य असणाऱ्या गोष्टी साध्य करण्यासाठी लोकांना मदत करत आहे.

संवादादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, मुद्रा योजना काही वर्षांआधी लागू केली असती तर लाखो लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायला मदत झाली असती आणि यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणात थांबले असते.

पंतप्रधानांशी संवाद साधतांना लाभार्थ्यांनी सांगितले की, मुद्रा योजनेमुळे स्वत:चा व्यवसाय सुरू करायला त्यांना कशी मदत झाली आणि त्यामुळे इतरांसाठी रोजगार कशा प्रकारे उपलब्ध झाला.

8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधानांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत नॉन कॉर्पोरेट, छोट्या आणि लघु उद्योजकांना 10लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. व्यावसायिक बँका, आरआरबीएस, छोट्या वित्त बँका, सहकारी बँका, एमएफआयएस आणि एनबीएफसीएस हे कर्ज वितरीत करतात.