पंचायतींमार्फत स्वयंरोजगार निर्मितीला चालना- श्रीपाद नाईक

0
805

गोवा खबर:उत्तर गोव्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक पंचायतीला खासदारनिधीच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड निर्मिती मशीन उपलब्ध करुन देणार असल्याचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज पिळगाव, डिचोली येथील समन्वीता प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

अशा कार्यांमुळे महिलांमध्ये रोजगाराबरोबरच आत्मसन्मानाची भावना निर्माण होते. महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्पांमुळे समाजात यावर अधिक मोकळेपणाने चर्चा होईल, असे ते म्हणाले. तसेच शाळांमध्येही सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशीन लावण्यात येईल का, यावर लवकरच सर्वेक्षण करण्यात येईल. अशा प्रकारचे प्रकल्प समाजाला दिशा देणारे असतात, त्यांना सरकारकडून नेहमीच सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. अशा प्रकल्पांमधून मेक इन इंडिया, राष्ट्रीय आरोग्य मोहीम, राष्ट्रीय आजिविका मिशन, कौशल भारत ही सर्व उद्दीष्टे साध्य करता येतील, असे श्रीपाद नाईक म्हणाले. पिळगाव येथे उबंटू फाऊंडेशनच्या सहकार्याने जयश्री परवार यांनी सॅनिटरी पॅड निर्मिती सुरु केली आहे.