न्यूड पार्टीची जाहिरात करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

0
947
गोवा खबर:उत्तर गोव्यात मोरजी येथे न्यूड पार्टी आयोजित करण्यात आली आहे अशी जाहिरात व्हायरल करून गोव्याची बदनामी केल्या प्रकरणीतील मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात  गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलासांना यश आले आहे. कातीहार- बिहारमध्ये अटक केलेल्या संशयिताला सोमवारी गोव्यात आणण्यात आले आहे. आज त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयिताचे नाव अरमान मेहता (30) असून त्याच्या विरोधात आयटी कायदा 67 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
संशयित मुळ बिहार येथील असून दिल्लीत येऊन तो न्यूड पार्टीसंदर्भात सोशल मिडीयावर जाहिरात करत असल्याचे उघड झाले आहे. खरोखरच न्यूड पार्टीचे आयोजन करण्यात येणार होते की अन्य कोणत्या कारणासाठी अशा प्रकारची संशयित जाहिरात करत होता याचा शोध पोलीस घेत आहेत.
सोशल मीडीयावर मोरजी येथील गोवा प्रायव्हेट पार्टीसंदर्भात (न्यूड पार्टी) 22 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर जाहिरात करण्यात आली होती. पार्टीला येण्यास इच्छूक असलेल्यांना संपर्क करण्यासाठी एक मोबाईल नंबर देण्यता आला होता. ही जाहिरात वॉटस्अपवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होताच गोव्यात खळबळ माजली होती.
 मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी न्यूड पार्टीच्या जाहिरातीमुळे गोव्याच्या होत असलेल्या बदनामीची दखल घेऊन पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते.
 सीआयडीचे अधीक्षक पंकज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक सिध्दांत शिरोडकर, राजेश कुमार, चेतन पाटील, हवालदार विजय साळगावकर, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, अशोक पालकर यांनी ही कारवाई केली आहे.
 पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरुन संशयिताचा ठावठिकाण शोधून काढला आणि ठिकठिकणी पोलीस पथक पाठवले. संशयित दिल्ली, बिहार डेराडून पच्छिम बंगाल येथे फिरत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
सोशल मीडीयावर जाहिरात करण्यात आलेल्या छायाचित्रात एकमेकावर नग्नवस्थेत पहुडलेल्या विदेशी महिला दिसत आहेत, तसेच या जाहिरातीवर गोवा प्रायव्हेट पार्टीच्या शिर्षकात न्यूड पूल पार्टी असा उल्लेख करण्यात आला होता.  त्यामध्ये मोरजी आश्वे रोड गावडेवाडा रोड, मोरजी गोवा असा पत्ता नमूद करण्यात आला होता.
गोव्याची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करू नका:मुख्यमंत्री

गोव्यात न्यूड पार्टी आयोजित केली असल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल करून गोव्याची बदनामी करणाऱ्या अरमान मेहता याच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले आहे.त्याच बरोबर गोव्याच्या पर्यटना बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकारण्यानी जबाबदारीने बोलावे,असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
न्यूड पार्टी गोव्यात होणार आहे,अशी खोडसाळ जाहिरात  देऊन गोव्याची बदनामी करणाऱ्या अरमान मेहता याला क्राइम ब्रांचने बिहार मधून अटक करून गोव्यात आणले आहे.न्यूड पार्टीची जाहिरात व्हायरल झाल्या पासून सरकारवर विरोधकांनी जोरदार टिका केली होती.त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी क्राइम ब्रांचतर्फे चौकशीचे आदेश दिले होते.या प्रकरणातील संशयित अरमान मेहता याला अटक केल्या नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्हिडिओ मेसेज जारी करून पोलिसांचे अभिनंदन केले शिवाय गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून सरकार चांगल्या पर्यटनाला नेहमीच प्रोत्साहन देत आले असल्याचे स्पष्ट केले.पर्यटनाच्या आडून सुरु असलेले गैरप्रकार खपवून घेतले जाणार नसून पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.