नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये विधानसभा अधिवेशन घ्या: विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांची राज्यपालांकडे मागणी

0
406
 गोवा खबर :विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना पत्र पाठवुन नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये विधानसभेचे पुर्ण कालावधिचे अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे.

विधानसभेचे मागील अधिवेशन झाल्यानंतर आता बराच कालावधी गेला आहे. कोविड संकटामुळे २७ जुलै ते ७ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी सरकारने एक दिवसांवर आणला व २७ जुलैला केवळ एक दिवसाचे सत्र घेतले याची आठवण  कामत यांनी राज्यपालांना करुन दिली आहे.
विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या २२ जुलै रोजी झालेल्या बैठकीत आपण सरकारकडे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये विधानसभेचे पुर्ण कालावधिचे अधिवेशन घेण्याची मागणी केली होती असे कामत यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
कॉंग्रेस विधीमंडळ गटाच्या ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत विधानसभेचे पुर्ण अधिवेशन घेण्याची मागणी करणारा  ठराव समंत करण्यात आला होता याचा उल्लेखही कामत यांनी आपल्या पत्रात केला आहे.
राज्यपालांना आज लिहीलेल्या पत्रात  कामत यांनी विधानसभा अधिवेशना सबंधी आपण सभापतीना ४ नोव्हेंबर रोजी लिहीलेल्या पत्राची माहिती दिली असुन, सोबत सदर पत्राची प्रत जोडली आहे.
आज गोव्यात कोविड महामारीच्या उद्रेकानंतर अत्यंत वाईट परिस्थीती असल्याचे  कामत यांनी राज्यपालांच्या लक्षात आणुन देताना, राज्याची कोसळलेली अर्थव्यवस्था, पर्यावरण नष्ट करण्याचे प्रयत्न, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, कोविड महामारी हाताळण्यात सरकारला आलेले अपयश व चांगली आरोग्यसेवा पुरविण्यास सरकारची असर्मथता अशा अनेक विषयांवर विधानसभेत सविस्तर चर्चा होणे गरजेचे असल्याचे  कामत यांनी म्हटले.
गोव्यात आज आंदोलने वाढत असुन, गोव्याची अस्मिता, पर्यावरण, वन्यजीव तसेच झाडे यांची कत्तल करुन सरकार प्रकल्प उभारु पाहत आहे. यास विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर येत आहेत याकडे कामत यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले आहे.
भगवान महावीर अभयारण्य, मोले राष्ट्रीय उद्यानांतुन जाणारे व पर्यावरणास बाधा पोचविणाऱ्या तिन प्रकल्पांना लोकांचा प्रखर विरोध होत असल्याचे सांगुन, राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण, रेल्वे दुपदरीकरण व वीजेची वाहिनी टाकण्यासाठी हजारो झाडांची होणारी कत्तल तसेच गोव्याचा कोळसा हब करण्याचा सरकारचा प्रयत्न यामुळे लोक रात्रं-दिवस आंदोलन करीत आहेत. सांत आंद्रे येथे मरिना प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा विरोध असुन, शेळ-मेळावली येथिल लागवडीच्या जमिनीत आयआयटी प्रकल्प आणण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे असे  कामत यांनी राज्यपालांना पत्रातुन कळविले आहे.
सरकारने जाणीवपुर्वक लोक आंदोलनांकडे दुर्लक्ष केल्याने आज आंदोलनांचा आवाका वाढत असल्याचे सांगुन, विधानसभा अधिवेशन घेवुन सरकारने विवीध प्रश्नांवर व विषयांवर सर्व चाळीस आमदारांना आपली भूमिका मांडण्यास सांगावी जेणे करुन लोकांनाही कोण कोणाच्या बाजुने आहे हे कळेल असे  कामत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.