नेत्रावळीच्या उपसरपंचा विरोधात शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

0
1995
 गोवा खबर:नेत्रावळीचे उपसरपंच अभिजीत देसाई यांच्या गैरकर्त्यांची आणि त्यांच्या दहशतीची दखल घेऊन त्यांच्यावर कठोर करवाई करावी अशी मागणी शिवसेनेने आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे केली.
शिवसेनेच्या उपाध्यक्षा राखी प्रभुदेसाई नाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्य सचिव वंदना लोबो,दक्षिण गोवा जिल्हा प्रमुख अलेक्सी फर्नांडिस,केपे तालुका प्रमुख संजय देसाई आणि म्हापसा शहर उपप्रमुख हेमलता यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पर्रिकर यांची सचिवालयात भेट घेऊन त्यांच्या समोर सांगे तालुक्यातील विविध प्रश्न मांडले.
नेत्रावळीचे उपसरपंच अभिजीत देसाई यांच्या विरोधात असलेल्या सगळ्या  तक्रारींचा उल्लेख असलेले निवेदन शिवसेनेने मुख्यमंत्री पर्रिकर यांच्याकडे सादर केले. सांगेचे पोलिस निरीक्षक सागर एकोस्ककर यांच्या कडून आपली दहशत वाढवण्यासाठी केल्या जात असलेल्या गैर कृत्यांचा पाढा देखील शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यां समोर वाचून दाखवण्यात आला.
सांगेचे पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मदतीने देसाई यांनी नेत्रावळीत जंगल राज चालवले असल्याकडे देखील शिवसेनेने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
नेत्रावळी मध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून देसाई यांनी स्वताच्या मर्जीने पचांयतीच्या नावाखाली बनावट शीक्के व बनावट पावतीकरून पर्यटकांकडून   बळजबरीने वसूल केलेल्या टोलची माहिती शिवसेनेने आपल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना सादर केली आहे.
देसाई यांच्या कारनाम्यां विरोधात पोलिस खात्या बरोबरच उप जिल्हाधिकारी आणि पंचायत संचालकांकडे अनेक तक्रारी दाखल असून देखील त्यांच्यावर कारवाई झालेली नसल्या बद्दल शिवसेनेने आश्चर्य व्यक्त केले.
नेत्रावळी बेकायदा टोल प्रकरणात देसाई यांच्या विरोधात एफआयआर दाखल होऊन देखील सांगे पोलिसांनी त्यांना साधे चौकशीसाठी सुद्धा बोलावले नाही याकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे.
सांगेत सर्वसामान्य लोकांना देसाई पोलिसांच्या मदतीने कसे त्रासात टाकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे मार्च महिन्यात अमित नाईक यांना पोलिस कोठडी झालेली मारहाण आहे असे सांगून शिवसेनेने अमित नाईक यांचे पोलिसांच्या मदतीने खाजगी वाहनातुन अपहरण करून त्यांच्या किडनीला दुखापत होई पर्यंत केलेली मारहाण करण्यापर्यंत देसाई यांची मजल गेली असल्याचे यात स्पष्ट केले आहे.अमित नाईक हे कँसरचे रुग्ण असून त्यांना या मारहाणी नंतर गोमेकॉमध्ये 5 दिवस दाखल होऊन उपचार घ्यावे लागले होते एवढी गंभीर स्वरूपाची मारहाण होती याकडे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.या मारहाण प्रकरणा नंतर दाखल झालेल्या तक्रारीच्या चौकशीचा फार्स कसा रंगवला होता याची माहिती देखील निवेदनात देण्यात आली आहे.
देसाई यांच्या विरोधात शिवसेनेने त्यांच्या बेकायदेशीर निवडणूक ओळखपत्राबद्दल एक तक्रार निवडणूक आयोगाकडे सादर केली होती मात्र त्या प्रकरणात देखील देसाई यांनी आपली सही सलामत सुटका करून घेण्यात यश मिळवले याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.
देसाई यांनी अलीकडेच प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिंन्हो यांना गावात बोलावून विनयभंग प्रकरणातील पीडित युवतीची भेट घालून दिली होती.यातून देसाई यांना फक्त स्वतःची पोळी भाजून घ्यायची होती मात्र सामाजिक भान नसल्याने देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पीडितेच्या आई सोबत काढ़लेला फोटो व्हायरल केल्यामुळे त्या मुलीचे जगणे मुश्किल झाले आहे याचा देखील निवेदनात उल्लेख आहे.