नॅशनल लॉ स्कूलच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
145

गोवा खबर: बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली व इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लिगल एज्युकेशन ऍण्ड रिसर्चची स्थापना करण्याच्या प्रकल्पासंबंधी चर्चा केली.

यावेळी शिष्टमंडळाने इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यात कायदा अभ्यासक्रमाच्या विविध शाखांचा समावेश असेल.

या प्रकल्पामध्ये कायदा विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त विविध गोष्टींचा समावेश असेल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. वकीलांसाठी लॉ अकादमीची स्थापना, प्रशिक्षणासाठी न्यायिक अकादमी यासारख्या गोष्टींचा त्यात समावेश असेल.

 

 गोव्यात हा प्रकल्प स्थापन झाल्यास गोव्याला त्यापासून होणार्‍या लाभांची माहिती शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिली. नॉलेज हब म्हणून विकसित होण्यात हा प्रकल्प गोव्याला लाभदायक ठरेल. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदा संस्था गोव्याकडे आकर्षित होतील, ज्यामुळे राज्याच्या सेवा क्षेत्राला लाभ होईल, तसेच पर्यटनालाही चालना मिळेल , असे यावेळी सांगण्यात आले.

 शिष्टमंडळाने दिलेली माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऐकून घेतली. हा प्रकल्प विचारात घेण्यापूर्वी सरकारतर्फे त्यावर व्यवस्थित अभ्यास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला ऍडव्होकेट जनरल ऍड. देविदास पांगम, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्री. जे. अशोक कुमार (आयएएस), श्री. विवेक एच. पी. (आयएएस) उपस्थित होते, असे माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.