गोवा खबर:उद्योन्मुख स्टार्टअप्सना त्यांच्या उद्योगविषयक कल्पना परीक्षकांसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नीती आयोगाने ‘पीच टू मूव्ह’ ही मोबिलिटी पीच स्पर्धा सुरू केली आहे.
गतिशीलतेच्या विविध क्षेत्रात काम करणारे स्टार्टअप्स गुंतवणूक वाढविण्यासाठी उद्योजक आणि व्हेंचर कॅपिटॅलिस्टसमोर आपल्या कल्पना मांडू शकतील. विजेत्यांना जागतिक गतिशीलता शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात येईल. रोजगार निर्मिती आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी या स्टार्टअप्सबरोबर एकत्रितपणे काम करणे हा स्पर्धेचा उद्देश असल्याचे निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत 7 आणि 8 सप्टेंबर रोजी विज्ञान भवन येथे जागतिक गतिशीलता शिखर परिषद होणार आहे.
मोबिलिटी पीच स्पर्धेच्या 2 फेऱ्या होणार आहेत.
पहिली फेरी-अर्ज मागवणे
इच्छुकांनी 12 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2018 दरम्यान http://mobility.pitch.movesummit.in/ या संकेतस्थळावर आपल्या स्टार्टअप्सविषयी सविस्तर अर्ज भरावा. तज्ञांकडून या अर्जांची छाननी केली जाईल आणि निवडण्यात आलेल्या उमेदवारांना पुढील फेरीसाठी बोलवले जाईल.
दुसरी फेरी-फायनल पीच
नवी दिल्लीत 4 सप्टेंबर 2018 रोजी फायनल पीच स्पर्धा होईल. पहिल्या फेरीत निवड झालेल्या स्टार्टअप्सना दुसऱ्या फेरीत परीक्षकांसमोर आपल्या कल्पना मांडण्यासाठी बोलावले जाईल. विविध निकषांच्या आधारे त्यांचे मूल्यमापन झाल्यानंतर अंतिम3 स्टार्टअप्सची विजेते म्हणून निवड केली जाईल. विजेत्यांना व्हेंचर कॅपिटॅलिस्टकडून सहाय्य मिळेल तसेच 8 सप्टेंबर रोजी शिखर परिषदेच्या समारोप सत्रात पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात येईल.