निरोगी राहण्यासाठी सर्वांनी पारंपारिक उपचार पद्धतींचा आधार घ्यावा:नाईक

0
1452

 

 

गोवा खबर:‘स्व खर्चाने येऊन गोव्यातील नागरिकांना शारीरिक दुखण्यापासून आराम देणारे देशभरातील शेकडो डॉक्टर हे प्रशंसनेस पात्र आहेत. सामान्य माणसाच्या सेवेसाठी हे डॉक्टर आपले वैद्यकीय कौशल्य वापरत आहेत, त्यामुळेच हि वैद्यकीय शिबिरे यशस्वी होत आहेत’, अशा शब्दात आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी डॉ. मनोज शर्मा व त्यांच्या ‘टीम’चे कौतुक केले. ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 

रवींद्र भवन, साखळी येथे आयोजित ५ दिवसीय मोफत आयुर्वेदिक न्युरो थेरपी मेडिकल कॅम्पच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

 

समाज आहे म्हणून आपण आहोत; समाजातील प्रत्येक घटक दुसऱ्यांना कोणती ना कोणती सेवा देत असतो; त्याचीच परतफेड म्हणून मी माझे कर्तव्य करत आहे, अशी भवन नाईक यांनी यावेळी व्यक्त केली. समाज निरोगी व्हावा, ही जबाबदारी केंद्राने आपल्यावर सोपवली, त्यासाठी आपण कार्यरत असल्याचे नाईक यांनी नमूद केले. योग्य डॉक्टर व गरजवंत रुग्ण अशी भेट घडवून सर्व नागरिक, कुटुंब, समाज तंदुरुस्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे व अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निरोगी राहण्यासाठी सर्वांनी आपल्या पारंपारिक उपचार पद्धतींचा आधार घेऊन योग्य जीवनशैलीला आत्मसात करावे, असे आवाहन नाईक यांनी उपस्थितांना केले.

 

४ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत संपन्न झालेले हे उपचार शिबीर मातृभूमी सेवा प्रतिष्ठान-गोवा, गोवा आरोग्य सेवा संचालनालय, आयुष विभाग तसेच आयुर्वेदिक न्युरो हॉस्पिटल व रिसर्च सेंटर-जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.