नियामक आणि धोरणकर्त्यांमध्ये संवाद महत्वाचा: पियुष गोयल

0
1541

दुसरी जागतिक उद्यम गुंतवणूक परिषद गोव्यात संपन्न

 गोवा खबर:जागतिक गुंतवणूकदारांसाठी ‘स्टार्ट अप इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल समिट’ ही फार महत्वाची आहे. त्यानिमित्ताने गुंतवणूकदारांना नियामक आणि धोरणकर्ते यांच्याशी संवाद साधायला मिळतो. परस्परांचे विचार, नावीन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकता यांची देवाणघेवाण होते, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केले.

त्यांनी आज व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून गुंतवणूक परिषदेला संबोधित केले. स्टार्अपच्या बाबतीत भारत जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे श्री गोयल म्हणाले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी परिषदेच्या उदघाटनाची औपचारिक घोषणा केली. या परिषदेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना गोव्याच्या संस्कृतीची, कार्यपद्धतीची आणि पायाभूत सुविधांची ओळख होईल, असे ते म्हणाले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभाग (डीपीआयआयटी) आणि गोवा सरकारच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डीपीआयआयटीचे सचिव डॉ गुरुप्रसाद महापात्रा यांनी परिषदेची संकल्पना विशद केली. स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतीय बाजारपेठ अतिशय योग्य असल्याचे डॉ महापात्रा म्हणाले. सरकारने स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी बरेच नियमन अडथळे दूर केले आहेत. तसेच सरकारने राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्काराची घोषणा केली आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दिवसभर चाललेल्या परिषदेत विविध विषयांवर परिसंवदाचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘नियम सक्षम करुन गुंतवणूकीच्या संधी वाढवणे’ या परिसंवादत टाटा ऑपर्च्युनिटीज फंडचे पद्मनाभ सिन्हा, इन्वेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक बागला, आयरीन कॅपिटल आणि मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे अध्यक्ष मोहन दास पै, सिडीबी व्हेंचर कॅपिटल लिमिटेडचे सीईओ राजेश कुमार, सेबीचे कार्यकारी संचालक एस.व्ही. मुरलीधर राव, भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक गणेश कुमार यांचा सहभाग होता.

परिषदेत 10 देशांतील आघाडीच्या कंपन्या तसेच स्टार्टअप्सचे 350 हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग होता. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘व्हेंचर कॅपिटल इकोसिस्टीम अहवाल-2019’ चे प्रकाशन करण्यात आले. ई-मोबिलीटी, फिनटेक, मेडटेक, एन्टरप्राईज सॉफ्टवेअर, एडटेक, जीनोमिक्स आणि लाईफसायन्सेस या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीबद्दल प्रामुख्याने या परिषदेत चर्चा करण्यात आली.