नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यास गोवा सज्ज

0
169

गोवा खबर : चांगल्या शिक्षणाची शक्यता निर्माण व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी गोवा सज्ज झाला आहे. या संदर्भात मुख्यामंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार तथा शिक्षणतज्ञ सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी स्थापना करण्यात आलेल्या राज्य कृती समितीची व्हिडियो कॉन्फरन्सींगद्वारे आल्तिन पणजी येथे बैठक घेतली.

शिक्षणमंत्री असलेले मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत यांनी धोरणाची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण सहकार्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, या धोरणाचे उद्दीष्ट आहे की प्राथमिक शिक्षणाची चौकट उच्च शिक्षणामध्ये तसेच व्यवसायिक प्रशिक्षणात रूपांतरीत व्हावी ज्यामुळे विद्यार्थांचा अविभाज्य आणि सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य कार्य समितीने प्राथमिक आणि व्यवसायिक शिक्षणाच्या विविध विषयांवर आणि अध्यापन विद्याशाखांच्या विविध बाबींवर चर्चा केली. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आराखडा तयार करणे आणि धोरणात केलेल्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी शिफारसी सादर करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या विविध टप्प्यांबाबत सभेत चर्चा करण्यात आली. व्यवसायीक क्षिक्षण ६वी ते ८वी वर्गापर्यंत सुरू होणार असल्याने एनसीआरटी द्वारे पुरविण्यात येणार्‍या अभ्यासक्रमावर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर अभ्यासक्रम तयार करण्याचा राज्य कार्य समितीचा विचार आहे. कार्य समिती प्रत्येक तालुक्यात बैठक घेईल व आपल्या शिफारसी सादर करेल.

विविध क्षेत्रातील कृती समितीच्या सदस्यांनी धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपल्या सूचना यावेळी बैठकीत मांडल्या. अध्यक्ष श्री. सुभाष शिरोडकर यांनी सदस्यांनी केलेल्या सूचनांचे स्वागत केले. शिक्षणतज्ञ डॉ. नंदकुमार कामत, अनिल सामंत, पुर्णिमा केरकर, विलास सतरकर, अँलन नरोन्हा, दिलीप आरोलकर, अरुण साखरदांडे, कांता पाटणेकर व इतरांनी संपन्न झालेल्या दुसर्‍या बैठकीत सूचना मांडल्या. शिक्षण खात्याचे संचालक संतोष आमोणकर, एससीईआरटीचे संचालक नागराज होन्नेकरी बैठकीस उपस्थित होते.