नवव्या सापुतरा मान्सून फेस्टिवलमध्ये पावसाळी निसर्गसौंदर्य आणि रंगबिरंगी गुजराती संस्कृती ठरणार पर्यटकांचे आकर्षण

0
1682
पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या या महिनाभर कालावधीच्या महोत्सव देणार सांस्कृतिक, साहसमय आणि खाद्यसंस्कृतीची मेजवानी
गोवा खबर: शनिवारी गुजरातमधील एकमेव हिल स्टेशन असलेला व पावसळी निसर्गश्रीमंतीने नटलेल्या सापुतऱ्याने भव्यदिव्य अशा सापुतरा मॉन्सून फेस्टिवलच्या उद्घाटनाचा सोहळा अनुभवला.  महिनाभर कालावधीचा हा महोत्सव ४ ऑगस्ट रोजी सुरू झाला असून ३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. सापुतरा लेक, बोट हाऊस मैदानावर या महोत्सवाचे उद्घाटन पर्यटन राज्यमंत्री श्री. गणपतसिंह वसावा आणि टीसीजीएलचे चेअरमन श्री. कमलेश पटेल यांच्या हस्ते झाले.
यंदा या महोत्सवाचे नववे वर्ष असून पावसाळी हंगामीतील सापुतऱ्याच्या निसर्गश्रीमंतीचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. प्रदर्शन, साहसमय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, अन्न महोत्सव, आनंददायी खेळ, स्पर्धा, फ्लॅश मॉब असे वैविध्यपूर्ण उपक्रम या महोत्सवादरम्यान आयोजित केले जातात. पर्यटकांना सापुतरा तळे, गांधी शिखर, इको पॉइंट, व्हॅली व्ह्यू पॉइंट, गिरा, गिरमल आणि मायादेवी धबधबा, शबरी धाम, पाम्पा सरोवर, पांडव गुफा, उनई मंदिर, सितवन, रजत प्राप, धूपगड जवळील त्रिधारा, हातगड किल्ला, वन रोपवाटिका, पांडव गुफा आणि आदिवासी संग्रहालय आदी ठिकाणची सफर या महोत्सवादरम्यान घडविली जाते. या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.
पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देणे, सापुतऱ्याचा हिल रिसॉर्ट स्थळ म्हणून विकास करणे आणि सापुतऱ्याच्या नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाबाबत जागृती घडविणे या उद्देशाने गुजरात टुरिझमच्या वतीने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. शासकीय स्रोतांनुसार, २०१५-१६ साली सापुतरा मान्सून फेस्टिवलला २.५ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली होती आणि त्याद्वारे १३.१९ कोटी रुपयांचे उत्पन्न स्थानिक प्रदेशातील अर्थकारणाला झाले होते. या महोत्सवामुळे नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक अशा जवळच्या मोठ्या शहरांतील लोकांना एक हक्काचे पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून सापुतऱ्याची ओळख बनली आहे.
पर्यटन विभागाद्वारे आरामदायी खोल्या व डॉर्मिटरीच्या माध्यमातून पर्यटकांसाठी निवासाची सोय उपलब्ध केली जाते. तसेच पर्यटन विभागाचे माहिती कार्यालयही पर्यटकांच्या दिमतीला २४ तास कार्यरत असते.
टीसीजीएलचे चेअरमन श्री. कमलेश पटेल म्हणाले, “दरवर्षी या मान्सून फेस्टिवलला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात सापुतऱ्याच्या सौंदर्याला नवा साज चढलेला असतो आणि त्यामुळे लोकांनाही येथे येणे आवडते.
देशभरातील विविध भागांतून येण्यासाठी आम्ही पर्यटकांना विविध आकर्षक पॅकेज सादर केली आहेत. या महोत्सवातील पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून सापुतऱ्याचा विकास तर होत आहेच, शिवाय येथील स्थानिकांनाही या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे.”
रमणीय डांगल जिल्हा आणि सह्याद्रीच्या गर्द टेकड्यांमध्ये सापुतरा नटलेला आहे. गुजरातमधील एकमेव पर्वतरांग म्हणून तसेच राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून सापुतऱ्याची ओळख बनली आहे.
सापुतरा मान्सून फेस्टिवलनंतर गुजरात टुरिझमद्वारे आगामी महिन्यांत इतरही महत्त्वाचे उपक्रम राबवले जातात. महाभारतातील द्रौपदीच्या स्वयंवराचा वारसा सांगणारी तरनेतर जत्रा गुजरातमधील लोकनृत्य, संगीत, वेशभूषा, कला वारशाचे दर्शन घडविते आणि वैवाहिक जीवनात प्रवेश करू इच्छिणाऱ्या युवा आदिवासी स्त्री-पुरुष हे या जत्रेच्या केंद्रस्थानी असतात. १२ ते १५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये या जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. नऊ रात्रींचा महोत्सव म्हणून नवरात्री हा भारत तसेच विदेशांतही एक प्रमुख हिंदू उत्सव म्हणून ओळखला जातो. यंदा १० ते १८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत हा उत्सव भरणार आहे. कला, कारागिरी, संगीत, नृत्य, निसर्ग आणि श्रीमंत मानवी वारसा म्हणून कच्छ प्रदेशाकडे पाहिले जाते. हिवाळ्यातील पौर्णिमेला रण ऑफ कच्छला सुरवात होते. यंदा १ नोव्हेंबर रोजी या उत्सवास सुरवात होत असून २० फेब्रुवारी २०१९पर्यंत तो चालणार आहे. तसेच उत्तरायण हा गुजराती जनतेचा लोकप्रिय उत्सव येतो. उत्तरायणच्या कालावधील गुजरातमधील शरहे, खेड्यांमध्ये पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आसमंतात पतंगोत्सव पाहालया मिळतो. थंडी संपून उन्हाळा सुरू होतो हा निसर्गचक्रातील टप्पा मकर संक्रांतीच्या माध्यमातून साजरा केला जातो. दरवर्षी १४ जानेवारी रोजी उत्तरायण साजरा केला जातो. यंदा ६ ते १४ जानेवारी २०१९ या कालावदीत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सापुतरा मान्सून फेस्टिवल आणि टुर पॅकेजबाबत अधिक माहिती घेण्यासाठी भेट द्या – www.gujarattourism.com