नवव्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाची घोषणा; के सेरा सेरा ठरला उद्धाटनाचा चित्रपट

0
957
गोवाखबर: नववा गोवा राज्य चित्रपट महोत्सव 3 ते 6 मे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.महोत्सवात 9 कोकणी आणि एका मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी आज महोत्सवाची घोषणा केली.
उद्धाटन सोहळा 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजता मॅकेनिझ पॅलेस एक मध्ये होणार आहे.राजू शिंदे दिग्दर्शित आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त के सेरा सेरा या चित्रपटाची उद्धाटनाचा चित्रपट म्हणून निवड करण्यात आली आहे.6 मे रोजी सायंकाळी 5 वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे.त्यानंतर महोत्सवात सर्वोत्कृष्ठ चित्रपट दाखवला जाणार आहे.
1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017 दरम्यान बनवलेल्या चित्रपटांनाच प्रवेशिका सादर करण्यास मुभा होती.त्यानुसार 10 चित्रपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या आहेत.त्यात 9 कोकणी आणि एका मराठी चित्रपटाचा समावेश आहे.2 नॉन फीचर फिल्म देखील महोत्सवात प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
चित्रपटांची निवड करण्यासाठी निवडलेल्या ज्यूरी मंडळाचे अध्यक्षपद गिरीश कासारवल्ली यांनी भूषवले होते.मंडळात प्रतिमा कुलकर्णी, अशोक पत्की, मीनाक्षी शिंदे यांचा समावेश होता.नॉन फीचर विभागासाठी ज्यूरी मंडळात  धृतिमान चटर्जी,अमित दत्ता आणि स्पंदन बॅनर्जी यांचा समावेश होता.
फीचर फिल्म विभागात 21 पुरस्कार दिले जाणार आहेत.सर्वोत्कृष्ठ चित्रपटाला 5 लाख रुपये,सर्वोत्कृष्ठ दुसऱ्या चित्रपटाला 3 लाख रुपये,सर्वोत्कृष्ठ प्रथम दिग्दर्शकाला 50 हजार तर द्वितीयला 35 हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.या व्यतिरिक्त सर्व वैयक्तिक पुरस्कार 25 हजार रूपयांचे असणार आहेत.नॉन फीचर फिल्म विभागात  सर्वोत्कृष्ठ फिक्शन चित्रपटाला 1 लाख रुपये,सर्वोत्कृष्ठ नॉन फिक्शन फ़िल्मला 1 लाख आणि 25 हजार रूपयांचे इतर 4 पुरस्कार दिले जाणार आहेत.सर्वोत्कृष्ठ चित्रपटाला 20 हजार रूपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.