गोवा खबर: नवव्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्या सायंकाळी सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर आणि खासदार नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे.आयनॉक्स 1 मध्ये सायंकाळी 5 वाजता उद्धाटन सोहळ्या नंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता के सेरा सेरा हा चित्रपट दाखवला जाणार आहे.
यंदा प्रख्यात सिनेमेटोग्राफर सूर्यकांत लवंदे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.समारोप सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.लवंदे हे गोमंतकीय असून त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये आपली छाप सोडली आहे.
समारोप सोहळा रंगारंग होणार आहे.रुस्तम फेम गायक आणि सा रे ग मा विजेता जसराज जोशीसह सोनिया सिरसाट आपली कला सादर करणार आहेत.ओरटेंसीओ परेरा कार्यक्रमात विनोदी तडका लगावणार आहे.परेरा यांना बेंगलोर येथील इमरान शेख यांची साथ लाभणार आहे.जोडीला मुंबई येथील सिधानी ग्रुप आणि गोव्यातील अमित आणि साक्षी आपल्या नृत्याचा जलवा पेश करणार आहेत.


दिग्गज कलाकार लावणार हजेरी
समारोप सोहळ्याला अभिनेत्री यामी गौतम, अभिनेता सुमित राघवन,अभिनेत्री पल्लवी सुभाष,दिग्दर्शक नागेश कुंकनूर उपस्थिती लावून सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.
गोवा राज्य चित्रपट महोत्सवात यंदा 10 चित्रपट आणि 2 लघुपटांची निवड करण्यात आली आहे.महोत्सवाला जोडून आयनॉक्स कोर्टयार्ड मध्ये खाद्य पदार्थांचे स्टॉल आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.गोवा कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन मॅकेनिझ पॅलेसच्या आर्ट गॅलरी मध्ये करण्यात आले आहे.हे प्रदर्शन 3 ते 6 मे दरम्यान खुले असणार आहे.





