नवभारत निर्मितीसाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता-मुख्यमंत्री

0
1721

वस्तू व सेवा कर दिन साजरा

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील नवभारत निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी या नव्या करप्रणालीची दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीय जीएसटी आणि राज्य जीएसटीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वस्तू व सेवा कर खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो, केंद्रीय जीएसटीचे प्रधान आयुक्त के. अनबलगन, राज्य जीएसटीचे आयुक्त दीपक बांदेकर यांची उपस्थिती होती.

जीएसटी कार्यकारिणीत राज्याचे प्रतिनिधीत्व केलेल्या माविन गुदिन्हो यांनी आपल्या भाषणात जीएसटी कार्यकारिणीच्या कामाचा आढावा घेतला. तसेच जीएसटी पद्धती गेल्या दोन वर्षात अत्यंत यशस्वी ठरल्याचे सांगितले. यात करदाते, व्यापारी, तसेच शासनाचा प्रत्येक विभाग अतिशय योग्य रितीने काम करत असल्याचे ते म्हणाले. राज्यातील हॉटेल व्यावसायिकांची बाजू आपण नेहमीच जीएसटी कार्यकारिणीत मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.

वस्तू व सेवा कर पद्धती ही सर्वांसाठी अतिशय लाभदायक असल्याचे केंद्रीय जीएसटीचे प्रधान आयुक्त के. अनबलगन म्हणाले. जकातनाके बंद केल्यामुळे वाहनांची आवक-जावक अतिशय सुलभ झाली आहे. तसेच व्यापाऱ्यांना आपले उत्पादन वेळेत पोहचवण्यासाठी याची अतिशय मदत होत असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारच्या जीएसटी विभागासोबत दर महिन्याला बैठकीचे आयोजन करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य जीएसटी विभागाचे आयुक्त दीपक बांदेकर यांनी आपल्या भाषणात राज्यातील करस्थिती सांगितली. जीएसटी लागू होण्यापूर्वी नियमित करदात्यांची संख्या 21806 होती ती गेल्या दोन वर्षात 33700 झाल्याचे त्यांनी सांगितले.