नवभारत निर्मितीसाठी योगदान द्या:मुख्यमंत्री

0
299
गोवा खबर:नवभारत निर्माण करण्यासाठी युवक-युवतींनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज येथे केले. तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी लागू केलेल्या आणिबाणीचा निषेध करण्यासाठी आज भाजपतर्फे काळा दिन पाळण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. 
आणीबाणीला विरोध केला म्हणून कारावास भोगावा लागलेल्या राजेंद्र आर्लेकर, मीनानाथ उपाध्ये, प्रा.श्याम कवठणकर, नागेश हेगडे आणि सुधीर परब यांना यावेळी मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक आदींच्या हस्ते मानपत्र समय शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले  देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यावेळच्या जनतेने आपले योगदान दिले ते स्वातंत्र्यसैनिक झाले. कॉंग्रेसच्या सरकारने देशावर आणिबाणी लादली  आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला. ही लोकशाही टिकून ठेवण्यासाठी त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि लोकशाही टिकवण्यात आपले योगदान दिले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नवनिर्माणाचा वसा घेतला आहे. त्यात युवकांनी आपले योगदान देणे आवश्यक आहे. यानंतरच्या काही वर्षांनी आपण योगदान दिल्यामुळे देशाचे कसे नवनिर्माण झाले हे आजच्या पिढीला समजणार आहे.
माजी मंत्री व माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी यावेळी आणीबाणीतील काळ्याकुट्ट दिवसांच्या आठवणी जागवल्या. तानवडे यांनी सर्वांचे स्वागत केले,सूत्रसंचालन भाजपचे माहिती तंत्रज्ञान विभाग संयोजक रुपेश कामत यांनी केले.