नरकसुरांसाठी आता जागवल्या जाणार रात्री

0
727
गोवा खबर: दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राज्यभरात नरकासुर बनवणारी मंडळे सक्रिय झाली आहेत.आज रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत अनेक मंडळांनी नरकासुर बनवण्यास सुरुवात केली आहे.दीपावली जवळ येईल तशी ही मंडळी रात्र जागवून नरकासुर पूर्ण करताना दिसणार आहेत.यंदा नरकासुरांवर पावसाचे सावट असल्याने त्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

नरकासुराचे दहन करून दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा गोव्यात शेकडो वर्षे सुरु आहे.दीपावलीला जेमतेम एक महीना उरला असल्याने राज्यात नरकासुर बनवण्याची तयारी सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
उत्तर भारतात दसऱ्यावेळी रावणाचे दहन करण्याची प्रथा आहे.गोव्यात दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा गोव्यात नसली तरी नरकचथुर्दशीच्या पहाटे नरकासुराचे दहन झाल्या नंतर अभ्यंगस्नान करून दीपावली साजरी करण्याची प्रथा आहे.
गोव्यात गल्लो गल्ली उभरलेले नरकासुर पहायला मिळतात.
नरकचथुर्दशीच्या रात्री हे नरकासुर बनवून लोकांना पाहण्यासाठी ठेवले जातात.रात्रभर लोक नरकासुर बघण्यासाठी आसपासच्या परिसरात फिरत असतात.
यंदा देखील अगदी एक फूटापासून 100 फूटापर्यंतचे नरकासुर बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.
पणजी येथील स्पार्कलिंग स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने कालपासून नरकासुर बनवण्यास सुरुवात केली आहे.क्लबचा अध्यक्ष शुभम प्रभू म्हणाला,दीवाळीला एक महीना असताना नरकासुर बनवण्याचे काम सुरु करावे लागते. नरकासुर बनवणारे कोणी नोकरी करतात तर कोणी शाळा,कॉलेज मध्ये जातात.त्यामुळे रात्री उशिराच सगळे एकत्र येतात.वेळ कमी मिळत असल्याने महीनाभर अगोदर सुरुवात करावी लागते.
नरकासुर बनवायला सुरुवात करताना त्याचा मुखवटा तयार करण महत्वाच असत,अस सांगून शुभम म्हणाला, आमच्या क्लबचा सन्नी उसगावकर हा मुखवटा बनवण्यात माहीर आहे.बाकीचे सदस्य त्याला माती आणून देणे आणि इतर स्वरूपाची मदत करतात.सध्या आम्ही मातीचा मुखवटा करत आहोत.नंतर त्यावर प्लास्टर ऑफ पॅरिस टाकून मुख्य मुखवटा तयार केला जाणार आहे.गेल्या वर्षी आमच्या क्लबचा नरकासुर सर्वोत्कृष्ठ ठरला होता.यंदा देखील आमच्या क्लबचा नरकासुर आगळा वेगळा असणार आहे.
शुभम म्हणाला, नरकासुर बनवायला साधारणपणे 80 ते 90 हजार रुपये खर्च येतो.आम्ही क्लबचे सदस्य पैसे काढतो,शिवाय आसपासचे लोक आणि हितचिंतक देखील मदत करतात.
यंदा पावसाने अजुन परतीची वाट धरलेली नसल्याने बनवलेला नरकासुर पावसापासून वाचवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
राज्यभरात हजारो नरकासुर बनवून त्यांचे नरकचथुर्दशीच्या पहाटे दहन केले जाते.त्यावर लाखो रुपयांची उलाढाल होत असते.नरकचथुर्दशीच्या रात्री डॉल्बीच्या दणदणाटाने लोकांचे लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न केला जातो.मडगाव येथे काही वर्षांपूर्वी नरकचथुर्दशीच्या रात्री बॉम्बस्फोट झाला होता.त्यावेळ पासून पोलिस देखील बंदोबस्त ठेवून आवश्यक ती खबरदारी घेत असतात.
दीपावली जवळ येईल तसे नरकासुराचे मुखवटे बाजारात यायला सुरुवात होणार आहे.नरकासुराच्या आकारानुसार नरकासुराचे मुखवटे बाजारात उपलब्ध असतात. आता एक ते दोन फूटा पर्यंतचे तयार नरकासुर देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. ज्यांच्याकडे नरकासुर बनवायला वेळ नसतो,अशी मंडळी तयार नरकासुर विकत घेण्याला प्राधान्य देतात.ओएलक्स सारख्या संकेतस्थळावर देखील आता नरकासुर विक्रीसाठी ठेवले जाऊ लागले आहेत.