नऊ किनारी राज्यातील नदीकाठ आणि तलाव स्वच्छ करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून 19 पथके स्थापन

0
1254

​​

जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने डॉ.हर्षवर्धन यांचे शाळा प्राचार्यांना प्लॅस्टिक-मुक्त शाळा बनण्याचे आवाहन

गोवा खबर:यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील समुद्र किनारे, नदीकाठ आणि तलावांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यासाठी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने 19 पथकांची स्थापना केली आहे. नऊ किनारी राज्यांमधील 24 समुद्रकिनारे आणि 19राज्यांमधील प्रदूषित परिसरातील 24 नदीकाठांच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले जाणार आहे. याशिवाय काही तलाव आणि जलाशयांच्या स्वच्छतेचे कामही सुरु केले जाणार आहे. यात राज्यातील मांडवी नदी आणि कलंगूट, मिरामार आणि कोळवा समुद्र किनारयाचा समावेश आहे.

19 पथकांमध्ये पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, किनारी भागातील मत्स्य महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक / संशोधन संस्थांचा समावेश असेल. शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्थानिकांना देखिल यात सहभागी करुन घेतले जाणार आहे.

प्रत्येक समुद्रकिनारा, नदीकाठ आणि तलावांच्या स्वच्छतेसाठी 10 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. महत्वाच्या पुरातत्व स्थळांच्या आसपासचा परिसरही स्वच्छ केला जाणार आहे. 15 मे पासून स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली असून ते 5 जूनपर्यंत चालेल. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्न मंजुषा, वाद-विवाद स्पर्धा, जनजागृती मेळाव्यांचेही आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कृष्णा आणि मुळा-मुठा या नद्या, मिऱ्या आणि गणपतीपुळे या समुद्रकिनाऱ्यांचा यात समावेश आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी देशभरातील शाळांच्या प्राचार्यांना पत्राद्वारे शाळा प्लॅस्टिक-मुक्त घोषित करण्याची विनंती केली आहे. प्लॅस्टिक-मुक्त शाळांना मंत्रालयाकडून ‘हरितशाळा / महाविद्यालय’ प्रमाणपत्रे वितरित केली जातील.