गोवाखबर:काल रात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील जन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.नदया,नाले तूडूंब भरून वाहत आहेत.दुपार नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
रात्री पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी पणजी सह मडगाव शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहतूक सेवा प्रभावित झाली होती.सखल भागातील घरांमध्ये पाणी गेल्यामूळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
     
राजधानी पणजी तर आज ‘पाणीजी’ बनली होती.स्मार्ट सिटी असलेल्या पणजी मध्ये बहुतेक सगळे रस्ते जलमय झाले होते.पाण्याचा निचरा होण्याची योग्य ती व्यवस्था नसल्याने सगळ्या ठिकाणी ढोपर भर पाणी साचले होते.स्मार्ट सिटी पावसाचा सामना करण्यास सक्षम नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मतदारसंघ असताना देखील लोकांना पावसात जगणे मुश्किल होऊ लागले आहे.अल्तिनो येथील पाणी वाहून जाण्यासाठी असलेली गटार व्यवस्था कूचकामी ठरत असल्याने सगळे पाणी रस्त्यांवरुन वाहत गोमंतक चौकात येत आहे.आज तर सांतिनेज चौकाला नदीचे स्वरूप आले होते.हॉटेल आनंद समोरील सर्व दुचाक्या पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या.18 जून रस्त्यावर देखील साचलेले पाणी दुकानांच्या दारापर्यंत पोचले होते.मळा आणि कामराभाट येथील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
डिचोली, साखळी भागात सुद्धा पुरसदृष्य स्थिती आहे.वाळवंटी नदिला आलेल्या पुराचे पाणी पंप लावून उपसुन काढले जात आहे.
पणजी शेजारील कामराभाट परिसरात अनेक घरात पाणी शिरुन मोठे नुकसान झाले.सांतिनेज खाड़ीची स्वस्छ्ता न झाल्याने ही खाडी दुथडी भरून वाहत होती.अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले आहे.काही ठिकाणी रस्ते खचले असल्याचे दिसून आले.