देशात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक करण्याचे क्रीडामंत्र्यांचे आवाहन 

0
7010

 

 गोवा खबर:देशात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक करण्याचे आवाहन क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी केले आहे. नवी दिल्लीत आयोजित “स्कोअर कार्ड 2018” या कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशातील क्रीडा क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले.

देशभरातील 8 ते 10 वर्षे वयोगटातील बालकांमधील क्षमता आणि कौशल्य हेरुन त्यांना उत्तम खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातील एका प्रकल्पावर सरकार काम करत असल्याची माहिती राठोड यांनी दिली. या कार्यक्रमाअंतर्गत देशभरातील 8 ते 10 वयोगटातील बालकांची आधारभूत चाचणी घेतली जाईल. त्यातून 5,000 विद्यार्थी निवडले जातील. या5,000 विद्यार्थ्यांच्या आणखी काही चाचण्या घेतल्यानंतर त्यातून 1,000 विद्यार्थी निवडले जातील. या बालकांमधून उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी त्यांना 8 वर्षांपर्यंत 5,00,000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल, जेणेकरुन वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत हे विद्यार्थी उत्कृष्ट खेळाडू होण्याच्या दृष्टीने सज्ज होतील असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला. या वर्षभरात क्रीडा साहित्य उत्पादकांची परिषद घेण्याचे आयोजन आपले मंत्रालय करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.